Sanju Samson Equals Yuvraj Singh Record, IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रांचीच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. डावाची सुरूवात करण्यासाठी आलेला अभिषेक शर्मा स्वस्तात माघारी परतला. पण संजू सॅमसनने एक बाजू सांभाळून ठेवली. या डावातही त्याला शतक झळकावण्याची संधी होती. पण तो ८२ धावा करून माघारी परतला. यादरम्यान अर्धशतक पूर्ण करताच त्याने मोठ्या रेकॉर्डमध्ये युवराज सिंगच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

संजू सॅमसनला गेल्या काही सामन्यांमध्ये हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्याच्या संघातील स्थानावर प्रश्न उपस्थित केले जात होते. पण दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याने आपल्या बॅटने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. या डावात त्याने सुरूवातीपासूनच चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आणि २१ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केलं आहे. संजूने आतापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ अर्धशतकं २०० हून अधिकच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना झळकावली आहेत. या रेकॉर्डमध्ये त्याने युवराज सिंगच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. युवराज सिंगनेही आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ५ अर्धशतकं ही २०० हून अधिकच्या स्ट्राईक रेटने पूर्ण केली होती.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० हून अधिकच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना अर्धशतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार यादव अव्वल स्थानी आहे. सूर्यकुमार यादवने १३ अर्धशतकं झळकावली आहेत. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या अभिषेक शर्माने १२ अर्धशतकं झळकावली आहेत. आता संजू सॅमसन हा युवराज सिंगसह संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. संजू सॅमसनकडे शतक पूर्ण करण्याची संधी होती. पण त्याचं शतक अवघ्या १८ धावांनी हुकलं.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० हून अधिकच्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण करणारे फलंदाज

सूर्यकुमार यादव- १३ वेळा
अभिषेक शर्मा- १२ वेळा
संजू सॅमसन- ५ वेळा
युवराज सिंग- ५ वेळा *

भारतीय संघाने केल्या २४९ धावा

या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. सलामीला आलेला अभिषेक शर्मा अवघ्या २० धावा करून माघारी परतला. तर संजू सॅमसनने ८२ धावांची वादळी खेळी केली. तर इशान किशनने ४३ धावा केल्या. शिवम दुबे ७ धावा करून माघारी परतला. इशान किशनने ४३ धावांची खेळी केली. शेवटी तिलक वर्मा आणि श्रेयस अय्यरने वादळी फटकेबाजी केली. श्रेयस अय्यरने ४० आणि तिलक वर्माने नाबाद ४४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ५ गडी बाद २४९ धावा केल्या.