Sanju Samson Opens Up On His Celebration: संजू सॅमसनच्या ९७ धावांच्या उत्कृष्ट खेळीमुळे टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरूद्ध शानदार विजय मिळवत सेमीफायनल गाठली. अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी ७ धावांची गरज होती आणि संजूकडे स्ट्राईक होती. संजूने पहिल्याच चेंडूवर व दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावत संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर संजू मैदानावर बसत त्याने ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं त्यामागची नेमकी भावना काय होती, याचं सॅमसनने उत्तर दिलं.
सलामीला आलेल्या संजू सॅमसनने ५० चेंडूत १२ चौकार व २ षटकारांसह ९७ धावांची खेळी केली. त्याचं शतक हुकलं असलं तरी त्याने त्याची ही मॅचविनिंग खेळी एखाद्या शतकापेक्षा कमी नव्हती. संजू सामना जिंकल्यानंतर मैदानावर बसला त्याने बॅट आणि हेल्मेट बाजूला टाकलं आणि आभाळाकडे पाहत दोन्ही हात उंचावले त्यानंतर ख्रिश्चन पद्धतीने तो नतमस्तक झाला आणि नंतर हात जोडत देवाचे आभार मानले.
भारताच्या निर्णायक विजयात मोलाची भूमिका बजावल्यानंतर संजू सॅमसनने आपल्या सेलिब्रेशनचा अर्थ जाहीरपणे सांगणं टाळलं. मात्र हे सेलिब्रेशन अत्यंत वैयक्तिक भावनेतून आलं होतं, हे त्याने स्पष्ट केलं. त्याच्या मते हा क्षण शतकापेक्षाही मोठा होता. विजयी धावा काढल्यानंतर भारतीय सलामीवीर गुडघ्यावर बसला, आकाशाकडे पाहत परमेश्वराचे आभार मानले.
संजू सॅमसन विजयानंतरच्या सेलिब्रेशनबाबत काय म्हणाला?
सतत विकेट्स पडत असलेल्या दबावाच्या सामन्यात केवळ आक्रमकता नव्हे, तर संयम, स्पष्ट विचार आणि जबाबदारीची जाणीव अधिक महत्त्वाची होती, असं सॅमसनने नमूद केलं. पार्थिव पटेलसोबत जिओ हॉटस्टारवर बोलताना सॅमसन म्हणाला, “हो, नक्कीच. खेळपट्टी थोडी कठीण होती. पण आमच्या फलंदाजीची ताकद पाहता ईडन गार्डन्सवर १९० धावांचा पाठलाग शक्य आहे, असा मला विश्वास होता. दव पडू लागल्यानंतर फलंदाजी थोडी सोपी होते. मात्र नियमित अंतराने विकेट्स पडत राहिल्यामुळे आव्हान वाढलं.”
यानंतर त्याने परिस्थितीनुसार आपल्या नैसर्गिक खेळात बदल कसा करावा लागला, हेही स्पष्ट केलं. “प्रामाणिकपणे सांगायचं तर इथेच माझा अनुभव आणि संघातील माझी भूमिका महत्त्वाची ठरली. मला चांगली सुरुवात मिळाली होती. साधारणपणे अशी सुरुवात मिळाल्यावर मी आक्रमक खेळ करत काही षटकांत सामना संपवण्याचा प्रयत्न करतो. पण सतत विकेट्स पडत असल्यामुळे मला जाणवलं की हा सामना शेवटपर्यंत नेणं आणि स्वतः फिनिश करणं गरजेचं आहे आणि तसंच घडलं,” असं तो म्हणाला.
म्हणाला, “हा अतिशय खास क्षण आहे. मी श्रद्धाळू माणूस आहे आणि ही भावना मी वैयक्तिकच ठेवू इच्छितो. हा माझ्यासाठी खूप विशेष क्षण आहे.” संजूच्या मैदानावरील या सेलिब्रेशनने लगेचच सर्वांचं लक्ष वेधलं, मात्र त्यामागील कारण त्याने उघड केलं नाही. त्याऐवजी त्याच्या शब्दांतील भावना आणि खेळीचा संदर्भच त्या क्षणाचे महत्त्व अधोरेखित करत होता.
संजू सॅमसन म्हणाला, “मी माझ्या बेसिक्सवर सातत्याने मेहनत घेत होतो आणि आज इतक्या खास सामन्यात त्याचं फळ मिळालं, याचा खूप आनंद आहे. मी माझा फोन बंद ठेवला, सोशल मीडियापासून दूर राहिलो. फक्त स्वतःच्या मनाचं ऐकलं आणि आत्ता ज्या भावना आहेत, त्याबद्दल मी खूप समाधानी आणि आनंदी आहे.”
सॅमसनसाठी म्हणूनच हे सेलिब्रेशन आणि हा दिवस विशेष महत्त्वाचा ठरला. संजू म्हणाला, “ही खेळी शतकापेक्षाही अधिक खास आहे. भारतात प्रत्येक क्रिकेटपटू अशा दिवसाचं स्वप्न पाहतो. केरळमधील एक तरुण मुलगा देशासाठी इतक्या महत्त्वाच्या सामन्यात विजय मिळवण्याचं स्वप्न पाहतो. ते स्वप्न पूर्ण करण्याचं धाडस मी केलं आणि आज ते साकार झालं, याचा खूप आनंद आहे.”
