Sanju Samson Vaibhav Suryavanshi Mimicry Video: बीसीसीआयचा नमन अवॉर्ड सोहळा पार पडला, या सोहळ्यात अनेक खेळाडूंना पुरस्कार देत त्यांच्या कामगिरीची शाबासकी देण्यात आली. यादरम्यान आयसीसी स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीदरम्यान वैभव सूर्यवंशीच्या पहिल्या आयपीएल सामन्यासंबंधित संजू सॅमसनने मोठा खुलासा केला, ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीला आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सने १.१० कोटींना आपल्या संघात सामीव केलं होतं. केवळ १४ वर्षांचा असताना, तो आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात तरुण खेळाडू बनला. त्याने लखनौ सुपर जायंट्ससंघाविरुद्ध खेळताना पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत आपलं खातं उघडलं. त्याच्या स्फोटक खेळीच्या बळावर त्याने क्रिकेट जगतात आपल्या नावाचा डंका वाजवला. नंतर त्याने २०२६ च्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तो अलीकडेच बीसीसीआयच्या नमन पुरस्कार २०२६ सोहळ्यात उपस्थित होता, जिथे संजू सॅमसनने त्याच्याबद्दलचा एक मजेदार किस्सा सांगितला.
बीसीसीआय नमन पुरस्कार २०२६ दरम्यान एक मजेदार क्षण पाहायला मिळाला. राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार संजू सॅमसनने तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशीबद्दल एक मनोरंजक किस्सा सांगितला, ज्यामुळे एकच हशा पिकला. नमन पुरस्कार सोहळ्यात संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांची हर्षा भोगले मुलाखत घेत होते. या मुलाखतीदरम्यान संजू सॅमसनने वैभव सूर्यवंशीची नक्कल केली.
वैभव सूर्यवंशीच्या IPL डेब्यपूर्वीच्या मिटिंगमध्ये काय घडलं होतं?
संजूने वैभवची नक्कल करत खुलासा केला की राहुल द्रविडने त्याच्या आयपीएल २०२५ पदार्पणापूर्वी त्याला एक गेम प्लॅन विचारला होता. राहुल द्रविड यांना काळजी होती नवा मुलगा आहे, १४ वर्षांचा आहे तर त्याच्याशी आपण बोलूया असं त्यांनी संजूला सांगितलं. संजू किस्सा सांगत म्हणाला, राहुल सरांनी त्याला विचारलं, वैभव काय प्लॅन आहे. वैभव म्हणाला, असं काही नाही सर, आपण खेळूया. सरांना परत विचारलं, तुझा गेमप्लॅन काय आहे? मला पहिला बॉल मिळाला तर पहिलाच बॉल उडवेन (म्हणजेच वैभव म्हणाला होता की, मला पहिलाच चेंडू स्लॉटमध्ये मिळाला तर मी षटकार मारेन.) आणि त्याने अगदी तेच केलं.
संजूने वैभवच्या आवाजात आणि शैलीत हे सांगितलं, ज्यामुळे द्रविड आणि इतर सर्वच जण हसू लागले. संजूने सांगितलं की वैभव मैदानावर असा खेळला जणू तो व्हिडिओ गेम खेळत आहे, पूर्णपणे त्याच्या झोनमध्ये, कोणत्याही भीतीशिवाय तो खेळत होता. आयपीएल २०२५ मध्ये, वैभवने शार्दुल ठाकूरच्या पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. नंतर, त्याने जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध ३८ चेंडूत १०१ धावांची धमाकेदार खेळी केली होती.
याच कार्यक्रमात, जेव्हा वैभव सूर्यवंशीला यंदाच्या आयपीएल हंगामात त्याचं लक्ष्य काय असेल असं विचारण्यात आलं, तेव्हा त्याने स्पष्ट केलं की त्याचं लक्ष्य त्याच्या संघाला ट्रॉफी जिंकण्यास मदत करण्यावर आहे. त्याने असंही सांगितलं की तो आयपीएलमधील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मोडू इच्छितो. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेलच्या नावावर आहे. २०१३ मध्ये गेलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना पुणे वॉरियर्सविरुद्ध १७५ धावा केल्या होत्या.
