वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात युवा वैभव सूर्यवंशीसाठी संजू सॅमसनने आपले सलामीचे स्थान सोडले. त्याने नि:स्वार्थीपणा दाखवून वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा संघहिताला प्राधान्य दिले. हे नक्कीच शिकण्यासारखे आहे, असे म्हणत भारताचा अन्य सलामीवीर अभिषेक शर्माने सॅमसनचे कौतुक केले.

वेलिंग्टन येथे झालेल्या तिसर्‍या ट्वेन्टी-२० सामन्यात अभिषेकने वैभवसह अवघ्या सात षटकांत १३३ धावांची भागीदारी रचली. वैभवने १९ चेंडूंत ४५ धावा फटकावत आपली आक्रमकता दाखवून दिली. इशान किशनच्या दुखापतीमुळे वैभवला दुसर्‍या सामन्यातही संधी मिळाली होती. मात्र, त्यावेळी त्याला त्याच्यासाठी अनोळखी असलेल्या तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली. परंतु तिसर्‍या सामन्यात सॅमसनने सलामीचे स्थान सोडल्याने वैभवला त्या जागी खेळता आले.

‘बीसीसीआय’च्या अधिकृत संकेतस्थळावर वैभवशी संवाद साधताना अभिषेक म्हणाला, ‘‘गेल्या सामन्यात संजूभाईने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यानंतर आपले नेहमीचे स्थान सोडणे सोपे नसते. त्याच्या या निर्णयातून त्याचा स्वभाव दिसून येतो. संघातील प्रत्येक जण नि:स्वार्थपणे विचार करतो आणि सहकार्‍याच्या यशात आनंद मानतो. हाच उत्तम संघाचा खरा गुण आहे.’’ या सामन्यात अभिषेकने अवघ्या ३८ चेंडूंत ११३ धावा केल्या. वैभवने पहिल्याच चेंडूवर सीमापार फटका मारत सुरुवात केली, याचेही अभिषेकने विशेष कौतुक केले. ‘‘वैभवने पहिल्याच चेंडूवर आक्रमकता दाखवली. त्याचा तो फटका पाहून मलाही स्फूर्ती मिळाली. त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यासाठी त्याला श्रेय द्यायलाच हवे,’’ असे अभिषेक म्हणाला.

‘मोठ्या भावांची जबाबदारी’

आमच्या संघात १५-१६ वर्षांचा एक अत्यंत गुणवान मुलगा आहे. भारतीय क्रिकेटमध्ये इतकी प्रतिभा आम्ही यापूर्वी पाहिलेली नाही. त्यामुळे त्याला योग्य वातावरण देणे आणि त्याच्या कारकीर्दीला योग्य दिशा मिळावी याची काळजी घेणे, ही आमची जबाबदारी आहे, अशा शब्दांत अभिषेकने वैभवविषयीची आपुलकी व्यक्त केली. अवघ्या १५ वर्षांच्या वैभवला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना कोणत्याही प्रकारचे दडपण जाणवू नये आणि त्याने आपल्या खेळाचा मनमुराद आनंद घ्यावा, यासाठी संघातील सर्व वरिष्ठ खेळाडू प्रयत्नशील असल्याचे अभिषेकने सांगितले.