‘मी आधीपासूनच शांत स्वभावाचा आहे पण आता मैदानात जास्त दिसतो त्यामुळे हा शांतपणा अधिक प्रकर्षाने जाणवतो’, असं संजू सॅमसन दिल्लीविरुद्धच्या लढतीत सामनावीर पुरस्कार स्वीकारल्यानंतर म्हणाला. संजूने २० षटकं यष्टीरक्षण केल्यानंतर, जवळपास २० षटकं फलंदाजी करत ५२ चेंडूत नाबाद ८७ धावांची दिमाखदार खेळी केली. या खेळीत ७ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.
तू या खेळीदरम्यान अतिशय शांत होतास. वर्ल्डकपदरम्यानही तुला असंच शांत पाहिलं होतं. हा बदल अलीकडचा आहे का असं समालोचक हर्षा भोगले यांनी संजूला विचारलं. त्यावर तो म्हणाला, ‘खरं सांगायचं तर मी आधीपासून शांतच आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून मी फलंदाजी करताना अधिक वेळ दिसत असल्याने हा शांतपणा अधोरेखित होतो आहे. सामना नसताना तुम्ही मला पाहिलंत तरी मी शांतच असतो. तोच माझा स्वभाव आहे’.
‘क्रीझमध्ये बॅकफूटवर जाऊन आक्रमण करण्याचं तंत्र गेल्या २-३ वर्षात अवलंबलं आहे. खेळपट्टीचा नूर कसा आहे तसंच गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करत आहेत हे पाहून ठरवतो. आजची खेळपट्टी काहीशी संथ होती. लक्ष्य आटोक्यातलं होतं. पॉवरप्लेमध्ये खूप धावा नाही झाल्या तरी नंतर भरून काढता येतील असं वाटलं. दोन विकेट गेल्यानंतर भागीदारीवर लक्ष केंद्रित केलं. कार्तिकने चांगली फलंदाजी केली’, असं संजूने सांगितलं.
शतक खुणावत होतं का यावर संजू म्हणाला, ‘नक्कीच. शतक हे नेहमीच खास असतं त्यामुळे ते डोक्यात होतं पण सामना जिंकून देणं तितकंच महत्त्वाचं होतं. २ गुण निर्णायक ठरू शकतात. शतकासाठी मला स्वार्थी व्हावं लागलं असतं. कार्तिकला सांगावं लागलं असतं की एकेरी धाव काढून स्ट्राईक दे. पण मी तसं केलं नाही. संघाच्या विजयात योगदान देऊ शकलो याचा आनंद आहे’.
लिलावापूर्वी झालेल्या ट्रेडऑफमध्ये राजस्थानने संजू सॅमसनला चेन्नईला दिलं तर चेन्नईने रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना राजस्थानला दिलं. सद्यस्थितीत दोन्ही संघांना ट्रेडऑफ फलदायी ठरलं आहे. संजू यष्टीरक्षण आणि सलामीवीर अशा दोन्ही भूमिका समर्थपणे निभावत आहे. कर्णधारपदाचा आणि स्पर्धेत खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव ऋतुराजला उपयोगी पडतो आहे. संजूने १० सामन्यात १६७च्या स्ट्राईकरेटने ४०२ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.
दुखापतींचं ग्रहण लागूनही चेन्नई सुपर किंग्स संघाला हळूहळू सूर गवसत आहे. दिल्लीविरुद्धच्या लढतीत विजयासह चेन्नईचे १० सामन्यात १० गुण झाले आहेत. प्लेऑफसाठी चुरस तीव्र होत असताना चेन्नईचे विविध खेळाडू फॉर्मात येत आहेत. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यंदाच्या हंगामात एकही सामना खेळलेला नाही. तो कधी परतेल याबाबत चेन्नई संघव्यवस्थापनाने कल्पना दिलेली नाही. धोनीच्या बरोबरीने नॅथन एलिस, आयुष म्हात्रे, खलील अहमद आणि रामकृष्ण घोष हेही दुखापतग्रस्त झाल्याने चेन्नईच्या अडचणीत भर पडली आहे. मात्र तरीही ऋतुराजच्या नेतृत्वात हा संघ सातत्याने जिंकू लागला आहे.
मंगळवारी झालेल्या लढतीत दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. संथ आणि धीम्या खेळपट्टीवर दिल्लीच्या फलंदाजांना सूर गवसलाच नाही. दिल्लीने १५५ धावांची मजल मारली. करुण नायर बाद झाल्यानंतर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या समीर रिझवीने ४० धावांची खेळी केली. ट्रिस्टन स्टब्जने ३८ धावा केल्या. या दोघांच्या भागीदारीमुळेच दिल्लीने समाधानकारक धावसंख्या नोंदवली. चेन्नईतर्फे नूर अहमदने २ तर अकेल हुसेन, मुकेश चौधरी, गुरजनपीत सिंग आणि जेमी ओव्हर्टन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड ६ धावा करून तंबूत परतला. उर्विल पटेलने आक्रमक सुरुवात केली पण अक्षर पटेलने त्याचा अडथळा दूर केला. संजू सॅमसनने कार्तिक शर्माला साथीला घेत तिसऱ्या विकेटसाठी ६६ चेंडूत ११४ धावांची भागीदारी केली. कार्तिकने ४ चौकार आणि २ षटकारांसह ३१ चेंडूत ४१ धावांची खेळी केली.
