Sanju Samson Statement on POTM Award: भारतीय संघाने संजू सॅमसनच्या ९७ धावांच्या खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजवर ५ विकेट्स आणि ४ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. भारतीय संघाने सहाव्यांदा सेमीफायनल गाठली आहे. सलामीला आलेल्या संजू सॅमसनने उत्कृष्ट खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला आणि विजयी धावा करत भारताला शानदार विजय मिळवून दिला. या विजयानंतर संजू काय म्हणाला, जाणून घेऊया.

संजू सॅमसन या सामन्यात सलामीला उतरला होता. एका टोकाकडून विकेट्स पडत असताना संजूने दुसऱ्या टोकाला पाय घट्ट रोवून ठेवत संपूर्ण सामन्यात संघाचा डाव सावरला. संजूने या सामन्यात ५० चेंडूत १२ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ९७ धावांची खेळी केली आणि भारताच्या विजयाचा पाया रचला. संजूने प्रत्येक खेळाडूसह महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.

संजू सॅमसन टी-२० विश्वचषक संघाचा भाग असतानाही सुरूवातीपासून खेळत नव्हता. पण अभिषेक शर्मा सातत्याने फेल होत असल्याने त्याला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पराभवानंतर संघात सामील केलं. संजूने संधी मिळाल्यावर संघाला चांगली सुरूवात करून दिली. अभिषेकच्या अनुपस्थितीत नामिबियाविरूद्ध सामन्यातही तो शानदार खेळला होता. पण वेस्ट इंडिजविरूद्ध जेव्हा एका टोकाकडून विकेट पडताना त्याने ज्या पद्धतीने संघाचा डाव सावरत खेळी केली आहे, जी त्याच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारी आहे. विश्वचषक खेळण्यासाठी वाट पाहण्यापासून ते विश्वचषकात भारताला सेमीफायनल गाठून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणं हा प्रवास संजूसाठी खूप मोठा होता.

सामनावीर पुरस्कारानंतर संजू म्हणाला, “हा क्षण माझ्यासाठी खरंच खूप मोठा आहे. मी ज्या दिवसापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली, देशासाठी खेळण्याचं स्वप्न पाहिलं, त्या दिवसापासून मी या क्षणाची वाट पाहत होतो. मी खूप आभारी आहे. माझा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता. अनेकदा स्वतःवर शंका घेतली, ‘मी करू शकेन का?’, ‘माझ्याकडून होईल का?’ असे प्रश्न पडत होते. पण विश्वास कायम ठेवला आणि आजचा दिवस देण्यासाठी परमेश्वराचे आभार मानतो. मी खूप आनंदी आहे.”

संजू सॅमसन सामनावीर पुरस्कारानंतर रोहित-विराटचं नाव घेत नेमकं काय म्हणाला?

रोहित-विराटचं नाव घेत संजू त्याच्या कामगिरीबद्दल म्हणाला, “मी हा फॉरमॅट बराच काळ खेळत आलो आहे. आयपीएलमध्ये १०-१२ वर्षे खेळलो आणि गेली १० वर्षे देशासाठी संघासोबत आहे. अनेकदा मैदानावर खेळलो नाही, पण डगआउटमध्ये बसून विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांकडून खूप काही शिकलो. निरीक्षण करणं आणि शिकणं खूप महत्त्वाचं असतं. मी कदाचित ५०-६० सामने खेळलो असेन, पण जवळपास १०० सामने पाहिले आहेत. महान खेळाडू सामना कसा संपवतात, परिस्थितीनुसार आपला खेळ कसा बदलतात. हे पाहून खूप शिकायला मिळालं.”

“मागील सामन्यात आम्ही प्रथम फलंदाजी करत होतो, त्यामुळे मोठी धावसंख्या उभारणं हे लक्ष्य होतं. त्यामुळे पहिल्याच चेंडूपासून मोठा फटका खेळायचा विचार होता. पण आजचा सामना वेगळा होता. जसा गती वाढवण्याचा प्रयत्न केला, विकेट्स पडू लागल्या. त्यामुळे भागीदारी रचणं आणि माझ्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं होतं. मी काही विशेष करीन असा विचार नव्हता; फक्त माझी भूमिका पार पाडायची आणि एकावेळी एक चेंडू खेळायचा, एवढाच विचार होता. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवसांपैकी एक आहे,” असं संजू पुढे म्हणाला.

“प्रेक्षकांकडून मिळणारी ऊर्जा आणि पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो. पण मनात नेहमी ‘जर जमलं नाही तर?’ असा विचारही येतो. तो विचार आला की मी स्वतःला वर्तमानात आणत होतो, फक्त चेंडूकडे लक्ष देत होतो आणि परिस्थितीनुसार योग्य फटका खेळण्याचा प्रयत्न करत होतो. आज ते यशस्वी ठरलं.”