वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतीय क्रिकेट संघातील सर्वच खेळाडू खूप गुणवान असल्याने प्रत्येक स्थानासाठी बरीच स्पर्धा असते. मात्र, आपल्याच सहकार्‍यांशी स्पर्धा करणे मला अवघड जाते. नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात सुरुवातीला मी अंतिम ११ खेळाडूंत नव्हतो, तेव्हाही इतरांना मदत करत होतो. त्यानंतर निर्णायक टप्प्यावर मला संधी मिळाली. संघाला माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या, त्यातूनच मला कामगिरी उंचावण्याची प्रेरणा मिळाली, असे वक्तव्य यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनने केले.

भारतीय संघाने नुकतीच मायदेशात झालेली ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकून इतिहास घडवला. या स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यांत सॅमसनला संघाबाहेर बसावे लागले होते. ‘‘माझ्यासाठी हे नक्कीच निराशाजनक होते. परंतु मी कधीही आशा सोडली नाही. मी संधीच्या प्रतीक्षेत होतो,’’ असे सॅमसन म्हणाला. सॅमसनला ही संधी ‘अव्वल आठ’ फेरीतील दुसर्‍या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध मिळाली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. ‘अव्वल आठ’ फेरीतील अखेरच्या सामन्यात भारताला विजय अनिवार्य असताना वेस्ट इंडिजविरुद्ध सॅमसनने नाबाद ९७ धावांची अप्रतिम खेळी केली. त्यानंतर उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध ८९ धावा आणि अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्धही ८९ धावांचीच खेळी करत सॅमसनने भारताच्या विश्वविजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

‘‘माझा स्वत:पेक्षा इतरांसाठी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न असतो. माझा तो स्वभावच आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी आम्ही न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळलो. त्यात संघातील स्थानासाठी मला सहकार्‍यांशीच स्पर्धा करावी लागत होती. माझ्यासाठी हे खूप अवघड होते,’’ असे सॅमसनने एका मुलाखतीत सांगितले. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पाच सामन्यांत मिळून सॅमसनला केवळ ४६ धावा करता आल्या होत्या. त्यामुळे त्याने अंतिम ११ खेळाडूंतील स्थान गमावले होते.

‘‘विश्वचषकात खेळणे हे माझे स्वप्न होते. त्या स्वप्नाच्या जवळ जाताना मला काहीही करून चांगली कामगिरी करायची होती. मात्र, त्याच प्रयत्नात मी अधिक गोष्टींचा विचार करण्यास सुरुवात केली. मला केवळ खेळावर लक्ष केंद्रित करणे अवघड जात होते. विश्वचषकापूर्वी अंतिम ११ खेळाडूंतील स्थान गमावल्यानंतर मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालो होतो. मी पाच-सहा दिवस संघापासून दूर गेलो. मी मानसिक स्थैर्य मिळवण्याचा प्रयत्न केला. खेळात काहीही होऊ शकते, आपण संधीसाठी तयार असायला हवे, असे स्वत:ला सांगितले. याचा मला पुढे जाऊन फायदा झाला,’’ असे सॅमसन म्हणाला.

संजूमधील विलक्षण प्रतिभेला पाठिंबागंभीर

संजू सॅमसनमध्ये विलक्षण प्रतिभा आहे. तो ‘पॉवर-प्ले’च्या सहा षटकांतही आम्हाला सामना जिंकवून देऊ शकतो. त्याच्यातील एकहाती सामना जिंकवून देण्याच्या क्षमतेमुळेच आम्ही त्याला कायम पाठिंबा दिला. त्याचेच आम्हाला फळ मिळाल्याचे भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने सांगितले.

ट्वेन्टी-२० विश्वचषकात सॅमसनने निर्णायक टप्प्यावर सलग तीन सामन्यांत अर्धशतके साकारली. अंतिम लढतीत त्याने आणि अभिषेक शर्माने मिळून ‘पॉवर-प्ले’मध्येच ९२ धावा काढत भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. ‘‘संजूमधील प्रतिभा आणि विस्फोटक खेळींची क्षमता वादातीत आहे. त्याला सूर गवसला, तर तो पहिल्या सहा षटकांतच सामना जिंकवून देऊ शकतो हे आम्हाला ठाऊक होते,’’ असे गंभीर म्हणाला.

‘‘संजू सुरुवातीच्या सामन्यांत संघाबाहेर होता. मात्र, झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी आम्ही एकत्रच जिममध्ये होतो. त्या वेळी मी त्याला या सामन्यात संधी देणार असल्याचे सांगितले. त्याला फार विचार न करण्याचा मी सल्ला दिला. आम्हाला अधिक आक्रमकता हवी होती आणि ती संजूने मिळवून दिली,’’ असे गंभीरने सांगितले.