निर्णायक सामन्यात संजू सॅमसनने साकारलेल्या नाबाद ९७ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा पराभव करत ट्वेन्टी—२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. संघाला जेव्हा सर्वाधिक गरज होती, त्यावेळी सॅमसनने आपली क्षमता सिद्ध केली, असे म्हणत भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने यष्टिरक्षक—फलंदाजाचे कौतुक केले.

संजू हा जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. त्याची गुणवत्ता वादातित आहे. त्याला फक्त पाठिंबा देण्याची गरज होती. संघाला जेव्हा त्याची सर्वाधिक आवश्यकता होती, तेव्हा त्याने आपली क्षमता दाखवली. त्याची कामगिरी खरोखरच कौतुकास्पद होती,असे गंभीर विंडीजविरुद्धच्या सामन्यानंतर म्हणाला. ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सॅमसन अखेरपर्यंत टिकून राहिला. त्याने पूर्णपणे नियंत्रण राखून फलंदाजी केली, असे गंभीरने नमूद केले. त्याने सर्व ‘क्रिकेटिंग शॉट्स’ मारले. चेंडूचा टप्पा पाहून त्यानुसारच सॅमसन फलंदाजी करत होता. तो चेंडूला जोरात मारताना दिसला नाही. त्याच्यातील नैसर्गिक प्रतिभा यावेळी ठळकपणे दिसून आली, असे गंभीर म्हणाला.

ट्वेन्टी—२० विश्व्चषक स्पर्धेपूर्वी झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सॅमसनला अपेक्षित यश मिळाले नव्हते. त्यामुळे त्याला थोडी विश्रांती देणे आवश्यक होते, असेही गंभीर यांनी स्पष्ट केले. कधी कधी खेळाडूला दडपणातून बाहेर काढणे गरजेचे असते. आम्हाला खात्री होती की विश्वचषकात जेव्हा गरज भासेल, तेव्हा तो नक्कीच चमकेल, असे गंभीरने सांगितले.

गंभीरने ‘पॉवर—प्ले’मधील गोलंदाजीचाही विशेष उल्लेख केला. पहिल्या सहा षटकांत भारतीय गोलंदाजांना बळी मिळवता आला नाही, पण त्यांनी विंडीजच्या सलामीच्या जोडीला केवळ ४५ धावा करू दिल्या. अशा मोठ्या सामन्यात नवीन चेंडूसह चांगली सुरुवात करणे महत्त्वाचे असते. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या यांनी सुरुवातीची तीन षटके उत्कृष्ट टाकली. तसेच अक्षरने पॉवर—प्लेमध्ये दोन षटके प्रभावीपणे पूर्ण केली. या खेळपट्टीवर ते सोपे नव्हते, असे गंभीर म्हणाला.