Sanju Samson- Varun Chakaravarthy Viral Video: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना चेस्टर ले स्ट्रीटच्या मैदानावर पार पडला होता. हा सामना पावसामुळे धुतला गेला होता. मालिकेतील दुसरा सामना ४ जुलैला मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडू मँचेस्टरमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन भारतीय संघाचा प्रवासातील एक खास व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो तुफान व्हायरल होत आहे.
भारतीय खेळाडू मैदानावर असताना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडतात. गोलंदाजांची चांगलीच धुलाई करतात. दरम्यान दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी मँचेस्टरला जात असताना, भारतीय खेळाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा असलेला ‘पेन फाईट’ हा खेळ खेळताना दिसून येत आहेत. चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, टीम बसमध्ये संजू सॅमसन आणि वरुण चक्रवर्ती हे दोघेही पेन फाईट हा खेळ खेळताना दिसून येत आहेत. हा खेळ आपण शाळेत असताना खेळायचो. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असतानाही वेळ मिळताच, भारतीय खेळाडू जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसून आले आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पहिला सामना पावसामुळे रद्द
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफे जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण सुरुवातीलाच हा निर्णय फसला. कारण संजू सॅमसन आणि इशान किशन हे दोघेही स्वस्तात माघारी परतले होते. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर या दोघांनी मिळून भारताचा डाव सावरला. दोघांनी दमदार अर्धशतकी खेळी केली. तर शेवटी शिवम दुबेने ४२ धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटकांअखेर ७ गडी बाद १८९ धावा केल्या होत्या. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी १९० धावा करायच्या होत्या. पण, पावसामुळे इंग्लंडला फलंदाजीला येण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे सामना रद्द करण्यात आला.
दुसरा टी-२० सामना कधी होणार?
या मालिकेतील दुसरा टी-२० सामना शनिवारी ४ जुलैला खेळवला जाणार आहे. हा सामना मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार रात्री १० वाजता सुरु झाला होता. पण दुसरा सामना ३ तासांआधी म्हणजेच, संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांची झोप मोड होणार नाही आणि पूर्ण २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळेल. भारतीय संघ हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मुख्य बाब म्हणजे, वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
