भारतीय संघाचं प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर गौतम गंभीर यांनी संजू सॅमसनला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. टी२० क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव असलेला संजू आणि युवा धडाकेबाज अभिषेक शर्मा यांची जोडी पक्की करण्यात आली. राईट-लेफ्ट असं कॉम्बिनेशन असलेल्या या जोडीने झंझावाती सलामी देण्याचं काम वर्षभराहून अधिक काळ केलं. उपकर्णधार म्हणून शुबमन गिलला संघात स्थान देण्यात आलं. त्यामुळे संजूला बाहेर बसावं लागलं. गिलला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. अजित आगरकर यांच्या निवडसमितीने वर्ल्डकपसाठी संघ निवडताना उपकर्णधार गिलला संघाबाहेर करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याऐवजी संजू आणि इशान किशन यांना प्राधान्य देण्यात आलं. उपकर्णधारपद अक्षर पटेलकडे सोपवण्यात आलं.
वर्ल्डकपमध्ये संजूऐवजी अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांच्या जोडीवर विश्वास ठेवण्यात आला. पण वर्ल्डकप सुरू होण्याच्या काही दिवस आधी अभिषेक शर्माची तब्येत बिघडली. त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. तब्येत स्थिर झाल्यानंतर त्याला सोडण्यात आलं. अमेरिकेविरुद्धच्या लढतीत अभिषेकऐवजी संजू खेळला. मात्र पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी अभिषेक फिट झाल्याने संजूला डच्चू देण्यात आला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या पराभवानंतर संघव्यवस्थापनाने संघाची पुनर्रचना केली. झिम्बाब्वेविरुद्ध रिंकू सिंगऐवजी संजू सॅमसनला संघात घेण्यात आलं. सलामीची जोडी बदलण्यात आली. संजू त्याचा जुना साथीदार अभिषेक शर्माच्या साथीने सलामीला आला. या दोघांनी ४८ धावांची सलामी दिली. संजूने त्या सामन्यात २४ धावांची खेळी केली. सेमी फायनलमध्ये प्रवेशासाठी भारतीय संघाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत विजय अनिवार्य होता. महत्त्वपूर्ण लढतीत १९६ धावांचा पाठलाग करताना संजूने नाबाद ९७ धावांची खेळी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. संजूने २० षटकं यष्टीरक्षण केल्यानंतर जवळपास २० षटकं फलंदाजी केली. संजूने ५० चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांसह ९७ धावांची थरारक खेळी साकारली. एका बाजूने सहकारी बाद होत असतानाही संजूने किल्ला लढवला. धावगतीचं आव्हान वाढत असताना संजूने योग्यवेळी चौकार,षटकार वसूल केले.
मूळ सलामीवीर असूनही संजूला संधी मिळण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्याची जागी अन्य खेळाडूला देण्यात आली. त्यानंतरही संघात स्थान मिळाल्यानंतरही अन्य खेळाडूंना प्राधान्य देण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला नसता तर कदाचित संजूला अंतिम अकरात संधी मिळाली नसती.
