scorecardresearch

संजू सॅमसनचे अर्धशतक!, लॉर्ड ठाकूर आणि तिलक वर्मा यांचीही शानदार फटकेबाजी

संजू सॅमसनच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारतीय २८४ धावासंख्या उभारली आहे. लॉर्ड ठाकूर आणि तिलक वर्मा यादोघांनीही शानदार फटकेबाजी केली.

संजू सॅमसनचे अर्धशतक!, लॉर्ड ठाकूर आणि तिलक वर्मा यांचीही शानदार फटकेबाजी
संग्रहित छायाचित्र (इंडियन एक्सप्रेस)

भारत अ विरुद्ध न्यूझीलंड अ यांच्यात मालिकेतील शेवटचा आणि तिसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे खेळल्या जाणाऱ्या या एकदिवसीय सामन्यात भारताचे नेतृत्व संजू सॅमसन करत आहे. या सामन्यात त्याने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली आहे. भारताने या सामन्यात ४९.३ षटकात सर्वबाद २८४ धावासंख्या उभारली आहे.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर अभिमन्यू इश्वरण आणि राहुल त्रिपाठी यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. अभिमन्यू इश्वरण व राहुल त्रिपाठी यांनी पहिल्या गड्यासाठी ५५ धावा जोडल्या. राहुल २५ चेंडूंत १८ धावा करून माघारी परतला. त्यानंतर १० धावांची भर घालून अभिमन्यू बाद झाला. त्याने ३५ चेंडूंत ८ चौकारांसह ३९ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या कर्णधार संजू व तिलक यांनी डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ९९ धावांची भागीदारी केली. तिलक ६२ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ५० धावांवर बाद झाला. श्रीकर भरत (९), राजा बावा (४), राहुल चहर (१) हे स्वस्तात बाद झाले. पण, संजूने ६८ चेंडूंत १ चौकार व २ षटकार खेचून ५४ धावांची खेळी केली. शार्दूल ठाकुरने अर्धशतक केले तर ॠषी धवन ३४ धावा करत धावबाद झाला. ठाकुरने ४ चौकार आणि ३ षटकाराच्या साहाय्याने ३३ चेडूंत ५१ धावा केल्या.

हेही वाचा   :  आयपीएलमधील महत्त्वाच्या समित्यांवर राहुल द्रविडची नियुक्ती, बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय 

भारत अ संघाने पहिले दोन सामने जिंकले असून मालिका आधीच नावावर केली आहे. त्याआधी भारताने कसोटी मालिकाही खिशात टाकली आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात गोलंदाजांमध्ये शार्दुल ठाकुर, कुलदीप सेन आणि कुलदीप यादव यांनी उत्तम कामगिरी केली आहे. यात सातत्य राखत मालिका ३-० ने जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या