राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनसाठी आयपीएल २०२२ स्पर्धेचा अतिशय चांगला ठरला आहे. संजूच्या नेतृत्वाखाली राजस्थानच्या संघाने १४ वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. केवळ कर्णधार म्हणूनच नाही तर फलंदाज म्हणूनही त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने १६ सामन्यात ४४४ धावा केल्या आहेत. त्याच्या या दुहेरी कामगिरीमुळे सध्या सर्वत्र त्याचे कौतुक सुरू आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी संजू सॅमसनच्या खेळाची आणि त्याच्या नेतृत्वगुणांची स्तुती केली आहे. संजू सॅमसनवर माजी भारतीय कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविडचा प्रभाव असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. संजू सॅमसन आणि राहुल द्रविड सुरुवातीपासून एकमेंकाच्या खूप जवळ आहेत. संजूच्या लग्नाचा व्हिडिओ बघितल्यानंतर याची खात्री होते.

मूळचा केरळचा यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या संजू सॅमसनने प्रेयसी चारुलतासोबत लग्न केलेले आहे. चारुलता ही केरळमधील तिरुअनंतपुरमची रहिवासी आहे. संजू सॅमसन आणि चारुलता हे महाविद्यालयामध्ये असताना वर्गमित्र होते. त्यांनी मार इव्हानिओस महाविद्यालयातून शिक्षण एकत्र शिक्षण घेतलेले आहे. पाच वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर दोघांनी २२ डिसेंबर २०१८ रोजी लग्न केले. आपल्या आवडत्या मुलीसोबत लग्न झाल्यामुळे संजू लग्नाच्या दिवशी आनंदी तर होताच. मात्र, त्याच्या आनंदासाठी आणखी एक व्यक्ती कारणीभूत होती ती म्हणजे राहुल द्रविड. माजी दिग्गज फलंदाज असलेला राहुल द्रविड संजू सॅमसनच्या रिसेप्शनला उपस्थित होता. इतकेच नाही तर त्याने नवविवाहित जोडप्याला मंचावर जाऊन शुभेच्छाही दिल्या होत्या. संजूच्या लग्नातील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी संजू सॅमसनने स्वत:ही राहुल द्रविडचे आपल्या आयुष्यातील महत्त्व सांगितले होते. राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असताना संजू सॅमसनला त्याच्याकडून भरपूर शिकायला मिळाले होते. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर राहुल द्रविडने काही काळ दिल्ली कॅपिटल्सचा मार्गदर्शक म्हणून काम केले. त्यावेळीही संजू दिल्लीच्या संघामध्ये होता. एका खासगी कार्यक्रमात बोलताना संजू सॅमसनने राहुल द्रविडबाबतच्या आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. “राहुल द्रविडकडून मला जो काही सल्ला मिळायचा तो माझ्या वहीत लिहायचो. मी त्याच्याबरोबर घालवलेली तीन-चार वर्षे माझ्यासाठी फार महत्त्वाची आहेत,” असे तो म्हणाला होता.