इंडियन प्रीमियर लीग या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेची सांगता अवघ्या काही तासावर येऊन ठेपली आहे. आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही तुल्यबळ संघांदरम्यान स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. १४ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राजस्थान रॉयल्सचा संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहचला आहे. संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर हे यश मिळवलेले असले तरी संजू सॅसमनच्या नेतृत्त्वाचे कौतुक झाले आहे. त्याने वेळोवेळी योग्य निर्णय घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या संघाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे सध्या तो चर्चेत आला आहे. संजू सॅमसनबरोबरच आता त्याची पत्नीदेखील चर्चेचा विषय ठरली आहे. तिने अंतिम सामन्यापूर्वी आयपीएलच्या अधिकृत प्रसारकांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अंतिम सामन्याच्या एक दिवस अगोदर कर्णधार संजू सॅमसनची पत्नी चारुलता हिने आपल्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीच्या माध्यमातून तिने आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तयार केलेल्या एका अॅनिमेशन मालिकेबद्दल अधिकृत प्रसारकांवर ताशेरे ओढले आहेत. तिने आपल्या स्टोरीवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे दिसत आहे. शिवाय त्यामध्ये राजस्थान रॉयल्स वगळता स्पर्धेतील इतर सर्व संघाचे कर्णधार दिसत आहेत.

आयपीएलच्या अधिकृत प्रसारकांनी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार किंवा इतर कुठलाही खेळाडू दिसत नसल्याने चारुलता नाराज झाली आहे. आता बरोबर अंतिम सामन्यापूर्वी तिने आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. “हंगामाच्या पहिल्या दिवशी आयपीएल २०२२ ची शर्यत दाखवणारा हा अॅनिमेटेड व्हिडिओ बघितला. त्यामध्ये गुलाबी जर्सी का नाही याचे आश्चर्य वाटले”, असा मजकुरासह तिने स्क्रीनशॉट शेअर केला. त्यानंतर तिने अंतिम सामन्यात पोहचलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संघाचाही एक फोटो शेअर केला आहे.

चारुलताच्या ताज्या इन्स्टाग्राम स्टोरीनुसार ती अहमदाबादमध्ये पोहचली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यादरम्यान ती प्रेक्षकांमध्ये बसून पती संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्सच्या संघाला पाठींबा देताना दिसू शकते.