नवी दिल्ली : भारतीय बॉक्सिंगचे माजी उच्च कामगिरी संचालक सँटियागो निएवा पुन्हा एकदा भारतीय संघाशी जोडले गेले आहेत. निएवा यांची महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून ते डी. चंद्रलाल यांची जागा घेतील. चंद्रलाल यांना मुख्य प्रशिक्षकपदावरून हटविण्यात आले असले, तरी ते साहाय्यकांच्या चमूचा भाग असतील.
अर्जेंटिनात जन्मलेले आणि स्वीडनचे नागरिक असणारे निएवा यांनी २०१७ ते २०२२ या कालावधीत भारतीय पुरुष बॉक्सिंग संघाबरोबर काम केले होते. त्यांच्या कार्यकाळात अनेक ऐतिहासिक क्षण भारतीय बॉक्सिंगने अनुभवले आहेत. यामध्ये टोक्यो ऑलिम्पिकमधील भारताचा आजपर्यंतचा सर्वाधिक सहभाग आणि २०१९ जागतिक स्पर्धेतील ऐतिहासिक दोन पदकांचा समावेश होता.
‘‘पुन्हा एकदा भारतीय बॉक्सिंगशी जोडला जाण्यासाठी मी उत्सुक आहे. गेल्या कार्यकाळात मी भारतीय बॉक्सिंगपटूंसह पाच वर्षे काम केले. नव्या कार्यकाळात महिला खेळाडूंना मार्गदर्शन करताना एकत्रित काहीतरी मोठी कामगिरी करण्याची मला आशा आहे,’’ असे निएवा म्हणाले.
निएवा यांच्याकडे दोन दशकांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षकपद भूषविण्याचा अनुभव आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियातही उच्च कामगिरी विभागात मुख्य प्रशिक्षक आणि तांत्रिक प्रमुख म्हणून काम केले आहे. ‘‘निएवा यांची नियुक्ती भारताच्या महिला बॉक्सिंगसाठी एक मोठी चालना ठरणार आहे,’’ असे भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष अजय सिंग यांनी सांगितले.
‘‘जगातील सर्वांत कठीण व्यासपीठांवर पोहोचू शकतो हे भारतीय खेळाडूंनी दाखवून दिले आहे. आता निएवा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जगातील सर्वांत मोठ्या टप्प्यांवर भारताची उपस्थिती आणि महत्त्वाकांक्षा बळकट करण्याचा विश्वास वाटतो,’’ असेही अजय सिंग म्हणाले.
या वर्षी भारतीय महिला बॉक्सिंगपटूंनी चांगली कामगिरी केली असून, त्यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदकांसह चार पदके जिंकली, तर मायदेशात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत दहा पदकांची कमाई केली.
भारतीय महिला बॉक्सिंग संघ भक्कम आणि प्रतिभावान आहे. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेपूर्वी मला काही गोष्टी हाताळाव्या लागतील. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे खेळाडूंची निवड. सध्या तरी फार मोठे बदल करण्याचा हेतू नाही. परिस्थिती आणि वेळेनुसार निर्णय घेईन. २०२८ च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये एकहून अधिक पदके भारताला जिंकवून देण्याचे माझे लक्ष्य आहे. – सँटियागो निएवा, भारतीय महिला बॉक्सिंग प्रशिक्षक.
