सामान्य लोकांना प्रसिद्ध व्यक्तींच्या खासगी आयुष्याबाबत नेहमीच उत्सुकता असते. त्यांच्यासोबतच त्यांचे मुल-मुलीदेखील लोकांच्या चर्चेचा विषय असतात. प्रसिद्ध व्यक्तींची मुलं काय शिकतात? कुठे शिकतात? कुठल्या पार्टीला गेले? कुणाला डेट करत आहेत? अशा कितीतरी प्रश्नांची उत्तर शोधण्याचा सर्रास प्रयत्न केला जातो. लोकांच्या आकर्षणाचा विषय असलेल्या स्टारकिड्सच्या यादीमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचाही समावेश होतो. तिने एका प्रसिद्ध फॅशन मॅगझिनसाठी फोटोशूट केल्याने ती चर्चेत आली आहे.
साराने लंडनमधील महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी घेतली आहे. असे असले तरी तिने काही दिवसांपूर्वीच फॅशनविश्वात प्रवेश केला आहे. अलीकडेच तिने व्होग या प्रसिद्ध मासिकासाठी लाल रंगाच्या ब्राइडल लेहेंग्यात फोटोशूट केले. व्होगने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून या फोटोशूटची झलक दाखवली आहे. तिचा नवरीच्या वेशातील हा फोटो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. साराने स्वत:च्या इन्स्टाग्राम स्टोरीवर देखील हा फोटो शेअर केला आहे.





सारा तेंडुलकर अलीकडच्या काळातील सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिचे इन्स्टाग्रामवर २.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. भारतीय क्रिकेटपटू शुबमन गिलसोबत साराचे नाव जोडले गेले होते. सारा सध्या लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. अलीकडेच तिने भाऊ अर्जुनसोबतचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.