Sara Tendulkar Shubman Gill Relationship: सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांच्या नात्याची सोशल मीडियावर सातत्याने चर्चा होत असते. दोघांची जोडी चाहत्यांना फार भावते आणि ते एकमेकांना डेट करत आहेत की नाही, याबाबत नेटकरी तर्कवितर्क लावत असतात. दोघांच्या कुटुंबीयांच्या सोशल मीडिया हालचालींवरूनही त्यांच्या नात्याबाबत चर्चा रंगत असते. आता अशाच एका गोष्टीमुळे सारा आणि गिल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सारा इन्स्टाग्रामवर अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान सारा तेंडुलकर इन्स्टाग्रामवर शुबमन गिलची बहीण शहनील गिलला फॉलो करते आणि तिच्या नुकत्याच एका पोस्टवर तिने कमेंटही केली होती. या कमेंटचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर आता सारा तेंडुलकरच्या मालकीच्या मुंबई ग्रिजलीज संघाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शुबमन गिलचे वडील फॉलो करत असल्याचं समोर आलं आहे.
ग्लोबल ई-प्रीमियर लीगमधील मुंबई ग्रिजलीज हा संघ असून सारा तेंडुलकर या संघाची मालक आहे. साराच्या मालिकीच्या संघाच्या फॉलोअर्समध्ये शुबमन गिलचे वडील आहेत. शुबमन गिलच्या वडिलांचं इन्स्टाग्राम अकाऊंट ‘gillshinda77’ या नावाने आहे. त्यांनी सारा तेंडुलकरचा समावेश असलेला एक व्हिडीओही लाइक केला आहे. या गोष्टीमुळे गिलच्या वडिलांना सारा आणि शुबमनच्या कथित नात्याची माहिती असल्याचा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत. हा स्क्रिनशॉट समोर आल्यानंतर सोशल मीडियावर सारा-शुबमनच्या नात्याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे आणि चाहत्यांनी बऱ्याच पोस्ट शेअर केल्या आहेत.
साराची स्वत:ची पिलाटेस अकादमी आहे. याशिवाय ती इन्फ्लुएन्सरदेखील आहे. दरम्यान सारा तेंडुलकर आयपीएल व भारताचे क्रिकेट सामने पाहायला उपस्थित असते. सारा तेंडुलकरला आयपीएलमध्ये सामना पाहण्यासाठी आल्यानंतरही पापराझींनी अनेकदा चिडवलं आहे, पण तिने कधीच या विषयावर वक्तव्य केलेलं नाही. तर शुबमन गिलनेही या विषयावर कधीही कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकर व भारताचा वनडे व कसोटी कर्णधार शुबमन गिल यांच्या नात्याच्या चर्चा सोशल मीडियावर पुन्हा सुरू झाल्या आहेत. या दोघांच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे त्यांच्या नात्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्या दोघांनी इन्स्टाग्रामवर बऱ्याच वर्षांपूर्वी सारखाच बॅकग्राऊंड असलेले फोटो शेअर केले होते, त्यामुळे हे दोघे डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली होती.
सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांनी त्यांच्या नात्याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही भाष्य केलेलं नाही. गिलने यापूर्वी आपण सिंगल असल्याचं म्हटलं होतं. मात्र, सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्ट्स आणि दोघांच्या कुटुंबीयांच्या हालचालींमुळे त्यांच्या कथित नात्याची चर्चा अधूनमधून पुन्हा रंगताना दिसते.
