England Cricket Team Appoints Female Cricketer as Fielding coach: इंग्लंडच्या क्रिकेट संघाने आपल्या विविध निर्णयांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. इंग्लंडचा संघ येत्या ४ जूनपासून न्यूझीलंडविरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी संघाने माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूला संघाच्या मुख्य सिलेक्टरपदी नियुक्त करत सर्वांना चकित केलं. यानंतर आता न्यूझीलंड मालिकेसाठी संघाने अजून एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. इंग्लंडने माजी महिला क्रिकेटपटूला संघाच्या फिल्डिंग कोचपदी नियुक्त केलं आहे.
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात आयपीएल २०२६ नंतर तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पहिला सामना ४ ते ८ जून दरम्यान लॉर्ड्सच्या मैदानावर होईल. तर दुसरा सामना १७ ते २१ जूनदरम्यान ओव्हलमध्ये होईल. तर तिसरा सामना २५ ते २६ जून ट्रेंट ब्रिज येथे होईल. दरम्यान इंग्लंड संघाची कसोटीमधील कामगिरी घसरल्याने क्रिकेट बोर्डाने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.
कोण आहे इंग्लंडची नवी महिला फिल्डिंग कोच?
दरम्यान, अॅशेस मालिकेदरम्यान इंग्लंडच्या क्षेत्ररक्षणातील मोठ्या चुका समोर आल्या होत्या. संपूर्ण मालिकेत इंग्लंडच्या खेळाडूंनी तब्बल ११ झेल सोडले, जे त्यांच्या लाजिरवाण्या पराभवामागील प्रमुख कारणांपैकी एक ठरलं. विशेष म्हणजे, त्या मालिकेत इंग्लंड संघाकडे अधिकृत क्षेत्ररक्षण प्रशिक्षक नव्हता.
इंग्लंडने पुरुष संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी सारा टेलर हिची नियुक्ती केली आहे. सारा टेलर ही इंग्लंड महिला संघाची यष्टीरक्षक फलंदाज राहिली असून, तिने संघाला दोन एकदिवसीय आणि एक टी-२० विश्वचषक जिंकून दिला आहे. इतकेच नव्हे, तर तिने तीन वेळा ॲशेस मालिकाही जिंकली आहे. सारा टेलरला दोनदा वर्षातील सर्वोत्कृष्ट टी२० क्रिकेटर आणि वर्षातील सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटर म्हणून गौरविण्यात आले आहे. तिला २०१२ आणि २०१३ मध्ये सर्वोत्कृष्ट टी २० क्रिकेटर आणि २०१४ मध्ये सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटर म्हणून गौरविण्यात आले.
सारा टेलर हिला पुरुष आणि महिला क्रिकेटमधील जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक मानलं जातं. तिने २००६ ते २०१९ या कालावधीत इंग्लंडकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण २२६ सामने खेळले आहेत. २०१७ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड महिला संघात टेलरची महत्त्वाची भूमिका होती.
सारा टेलरने इंग्लंडसाठी १२६ एकदिवसीय, ९० टी-२० आणि १० कसोटी सामने खेळले आहेत. टेलरने एकदिवसीय सामन्यांमध्ये ३८.२६ च्या सरासरीने ४,०५६ धावा केल्या आहेत, ज्यात सात शतकं आणि २० अर्धशतकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, तिने टी-२० सामन्यांमध्ये २९.०२ च्या सरासरीने २,१७७ धावा केल्या आहेत, ज्यात १६ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये साराने १८.७५ च्या सरासरीने ३०० धावा केल्या आहेत.
