भारतीय हॉकी संघाचा अनुभवी खेळाडू म्हणून ओळख असलेल्या सरदार सिंहने आशियाई खेळांनंतर आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती स्विकारली. मधल्या काही काळात सरदारचा खेळ खालावल्यामुळे त्याला संघाबाहेर बसवण्यात आलं होतं. मध्यंतरीच्या काळात ‘हॉकी इंडिया’त अनेक स्थित्यंतरं झाली. राष्ट्रकुल स्पर्धेतल्या खराब कामगिरीचं कारण देत हॉकी इंडियाने प्रशिक्षक जोर्द मरीन यांना पुन्हा एकदा महिला संघाची जबाबदारी सोपवली तर हरेंद्रसिंह यांना पुरुष संघाचं प्रशिक्षकपद दिलं. मात्र आशियाई खेळांमध्ये भारतीय संघाला उपांत्य सामन्यात मलेशियाकडून हार पत्करावी लागली, नंतर कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात केली. या स्पर्धेनंतर सरदारने निवृत्त होणं पसंत केलं. मात्र आपल्या निवृत्तीला प्रशिक्षक जोर्द मरीन आणि भारतीय संघाचे High Performance Director डेव्हिड जॉन जबाबदार असल्याचं सरदारने म्हटलं आहे. तो टाइम्स ऑफ इंडियाशी बोलत होता.

रोलंट ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीनंतर सर्व गोष्टी माझ्याविरोधात घडायला लागल्याचं, सरदारने सांगितलं. “मी निवृत्तीचा निर्णय घेण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. डेव्हिड जॉन आणि मरीन यांना संघात नवीन खेळाडूंना स्थान द्यायचं होतं. आम्ही २०१७ सालचा आशिया चषक जिंकला होता, यानंतर माझं संघातलं स्थान कायम राहिलं असं मी समजून चाललो होतो. मात्र कोणतही कारण न देता मला संघातून मध्येच डावलण्यात आलं.” सरदारने आपली कहाणी सांगितली.

यानंतर काही काळातच मला ज्युनिअर खेळाडूंसोबत सुलतान अझलन शहा स्पर्धेसाठी पाठवलं. मात्र परत आल्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेसाठी मला पुन्हा डावलण्यात आलं. यादरम्यान मी शाररिकदृष्ट्या तंदुरुस्त होतो, मात्र मला सतत डावलत असल्यामुळे मी माझ्या खेळाबद्दल साशंक झालो. सरदारने यो-यो फिटनेस टेस्टमध्ये २१.४ गुणांची कमाई करत आपण फिट असल्याचं दाखवून दिलं होतं. मात्र चाचणीदरम्यान डेव्हिड जॉनने मला ‘स्लो प्लेअर’ अशी टीका केल्याचंही सरदार म्हणाला. मी पहिल्यापासून कधीही आक्रमक खेळ केला नाही, माझी ती शैली नाही. मात्र मध्यंतरी प्रशिक्षकांनी मला खेळात काही सुधारणा सांगितल्या त्या मी मान्यही केल्या. मात्र राष्ट्रकुल स्पर्धेसाठी संघ निवडताना प्रशिक्षक मरीन यांनी मला वगळून संघाची घोषणा केली. अशा परिस्थीतीत खेळतं राहणं माझ्यासाठी शक्य नव्हतं, म्हणूनच मी निवृत्तीचा निर्णय घेतल्याचं सरदारने स्पष्ट केलं.

दरम्यान आशियाई खेळांमधील भारतीय संघाच्या कामगिरीवर हॉकी इंडिया सध्या चांगलीच नाराज आहे. संघाचे प्रशिक्षक व इतर सहायक प्रशिक्षक यांना हॉकी इंडियाने भारतात होत असलेल्या विश्वचषकापर्यंत मुदत दिलेली आहे. संघाच्या कामगिरीत सुधारणा न झाल्यास नवीन पर्यायांचा विचार केला जाईल असंही मध्यंतरीच्या काळात हॉकी इंडियाने स्पष्ट केलं होतं. नोव्हेंबरमध्ये ओडीशामधील भुवनेश्वर येथे हॉकी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे, त्यामुळे घरच्या मैदानावर खेळताना भारतीय संघाची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.