हॉकी इंडिया लीगच्या चौथ्या सत्रासाठी आज लिलाव
हॉकी इंडिया लीगच्या (एचआयएल) चौथ्या सत्रासाठी गुरुवारी होणाऱ्या लिलावात भारताचा कर्णधार सरदार सिंगसह जेमी ड्व्ॉयऱ, रुपिंदर पाल सिंग आणि मोरित्ज फुएर्टस यांना आपापल्या चमूत दाखल करून घेण्यासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. पुढील दोन सत्रांसाठी पार पडणाऱ्या या लिलावात १३५ भारतीय, तर १४२ परदेशातील अशा एकूण २७७ खेळाडूंवर बोली लागणार आहे.
या लिलावात सरदार सिंग याच्यावर अधिक बोली लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दिल्ली वॉरियर्सने त्याला मुक्त केले असून त्याची मूळ किंमत २० लाख रुपये असणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या नव्या नियमांनुसार ही स्पर्धा खेळविण्यात येणार असल्यामुळे लिलाव प्रक्रियेत महासंघचे मुख्य कार्यकारी अधिकारी केली फेरवेदर यांची उपस्थिती असणार आहे. या नव्या नियमानुसार प्रत्येक संघमालक १२ भारतीय आणि ८ परदेशी असे एकूण २० खेळाडूंना खरेदी करू शकतो.
एचआयएल आणि हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा म्हणाले की, ‘‘प्रत्येक संघ मालक सर्वोत्तम खेळाडूला निवडण्यासाठी चढाओढ करताना पाहायला मिळणार आहेत. त्यात नव्या नियमामुळे ही स्पर्धा आणखी रंजक होणार आहे. एक मैदानी गोल केल्यावर दोन गुण मिळत असल्यास सर्वोत्तम स्ट्रायकर निवडण्याची रणनीती संघमालकांनी आखली असावी. त्यामुळे लिलाव प्रक्रियेत चुरस बघू शकतो.’’