भारतीय संघात वेगवान गोलंदाजांचे स्थान नेहमीच अस्थिर राहिलेले आहे. एकीकडे भारताला वेगवान गोलंदाजांची उणीव जाणवत असताना मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर सातत्याने भेदक मारा करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने चार बळी मिळवले, यामध्ये ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिस आणि कसोटी कर्णधार हशिम अमला यांचा समावेश होता. या दोन्ही दादा फलंदाजांना बाद केल्यावर शार्दूलचा आत्मविश्वास उंचावला असून त्याने भारतीय संघाचे दार ठोठावले आहे. यावर ‘‘फक्त चांगली कामगिरी करणे माझे काम आहे. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारतीय संघात स्थान मिळेल, अशी मला आशा असली तरी बाकीचा निर्णय निवड समितीच्या हातामध्ये आहे,’’ असे शार्दूल म्हणाला.

‘‘या मोसमातील आतापर्यंतची ही माझी चांगली कामगिरी आहे. हशिम अमला आणि फॅफ डय़ू प्लेसिससारख्या फलंदाजांना बाद केल्याचा आनंद आहे. भारतीय संघातील निवड माझ्या हातात नाही. सातत्याने बळी मिळवण्याचा मी प्रयत्न करतो आणि तेच मी प्रामाणिकपणे करत राहीन,’’ असे शार्दूल म्हणाला.

गेल्या रणजी मोसमात शार्दूलने संयुक्तपणे सर्वाधिक ४८ बळी मिळवले होते. मुंबईच्या डावाचे सारथ्य करताना त्याने नेहमीच संघाला यश मिळवून दिले आहे. सराव सामन्याच्या पहिल्या दिवशीही त्याने आफ्रिकेच्या दोन्ही फलंदाजांना बाद केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अमला आणि प्लेसिस यांना बाद करत त्यांनी पाहुण्यांची ५ बाद ५७ अशी अवस्था केली होती.

‘‘अमलासाठी मी खास रणनीती आखली होती. अमला स्थिरस्थावर झाल्यावर मोठी खेळी साकारतो. त्यामुळे त्याला झटपट बाद करण्याचा मी प्रयत्न केला. सातत्याने यष्टींच्या दिशेने टप्पा टाकत गेलो. प्रत्येक चेंडूमागे एक विचार होता आणि त्याचेच फळ मला मिळाले,’’ असे शार्दूल म्हणाला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात वरुण आरोन, उमेश यादव आणि इशांत शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. यापैकी आरोन आणि यादव यांच्या कामगिरीत सातत्यपणा दिसलेला नाही. इशांतला भारताचा प्रमुख गोलंदाज म्हणत असले तरी त्या लौकिकाला सातत्यपूर्ण कामगिरी त्याच्याकडून होताना दिसत नाही. त्यामुळे भारतीय संघासाठी २४ वर्षीय शार्दूल हा चांगला पर्याय ठरू शकतो. शार्दूल सध्या १४२-१४५ कि.मी. प्रति तास वेगाने गोलंदाजी करत आहे. त्याला संधी दिल्यास भारताला एक युवा वेगवान गोलंदाज मिळू शकतो.