Vijay Hazare Trophy Sarfaraz Khan Hundred: सर्फराझ खानने वादळी खेळीसह वर्षाचा शेवट अगदी गोड केला आहे. २०२५ च्या अखेरच्या दिवशी विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्फराझ खानने एक दमदार शतक झळकावलं. मुंबई आणि गोवा यांच्यातील सामना जयपूरमध्ये खेळला जात होता, या सामन्यात सर्फराझ खानने ५९ चेंडूत शतक करत सर्वांचं लक्ष वेधलं. या खेळीदरम्यान त्याने अर्जुन तेंडुलकरची चांगलीच धुलाई केली. दीडशतकी खेळीसह मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ४४४ धावा केल्या आहेत.

गोवा विरुद्ध सामन्यात सर्फराझ खान व त्याचा भाऊ मुशीर खान यांनी ९३ धावांची भागीदारी केली. मुशीर खान ६० धावा करत माघारी परतला. यानंतर सर्फराझ खानने डावाची जबाबदारी घेत ७५ चेंडूत १५७ धावा केल्या. २०९ पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धुव्वाधार फटकेबाजी करताना त्याने १४ षटकार आणि ९ चौकारांसह ही खेळी साकारली. त्याने फक्त ५७ चेंडूत शतक पूर्ण केलं. सर्फराझ खानने शतक पूर्ण करण्यासाठी आठ षटकार मारले.

विजय हजारे ट्रॉफीच्या चालू हंगामातील सर्फराझ खानचं हे पहिलं शतक आहे. या हंगामात त्याची मागील सर्वोत्तम धावसंख्या ५५ ​​होती, जी त्याने उत्तराखंडविरुद्ध सामन्यात केली होती. लिस्ट ए क्रिकेटमधील सर्फराझ खानचं हे तिसरं शतक आहे. सर्फराझ खानने गोव्याच्या सर्वच गोलंदाजांविरूद्ध हल्लाबोल केला. पण यादरम्यान त्याने अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीविरूद्धही शानदार फटकेबाजी केली.

अर्जुन तेंडुलकरने ८ षटकांत ७८ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. मुंबई संघाने ५० षटकांत ८ बाद ४४४ धावांची विक्रमी धावसंख्या उभारली. यशस्वी जैस्वालने ४६ धावा करत संघाला चांगली सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला. यानंतर मुशीर खाने ६० धावांची व सर्फराझ खानने १७५ धावांची खेळी केली. याशिवाय कर्णधार शार्दुल ठाकूरने २७ धावांचं योगदान दिलं. तर यष्टीरक्षक हार्दिक तामोरे याने २८ चेंडूत ६ चौकार व २ षटकारांसह ५३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर शम्स मुलाणीने २२ धावा तर तनुष कोटियन यांनी २३ धावांची खेळी केली.