सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत भारतीय खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत एकापेक्षा एक विक्रमी शतक करत आपल्या खेळीची छाप पाडत आहेत. दरम्यान मुंबई आणि आसाम यांच्यातील सामन्यात सर्फराझ खानन ४७ चेंडूत वादळी शतक झळकावलं आहे. त्याच्या शतकाच्या बळावर मुंबई संघाने २२० धावांचा मोठा डोंगर उभारला.

सर्फराझने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आसामविरुद्ध त्याच्या टी-२० कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. सर्फराझने ४७ चेंडूत ८ चौकार व ७ षटकारांसह शतकी खेळी साकारली. सर्फराझ खानने भारताकडून पदार्पण केल्यानंतर त्याला टीम इंडियात पुन्हा संधी मिळालेली नाही. यामुळे सर्फराझने भारतातील सर्वात मोठ्या टी-२० स्पर्धेत हे शतक झळकावत पुनरागमनासाठी मजबूत दावा ठोकला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून सर्फराझ देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करत आहे. रणजी ट्रॉफीमध्ये सातत्याने मोठ्या खेळी शतकं आणि कसोटी पदार्पणात अर्धशतक झळकावूनही, तो अजूनही भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी संघर्ष करत आहे. याशिवाय आयपीएलमध्येही सर्फराझ अनसोल्ड राहिला होता. त्यामुळे आगामी सीझनच्या आयपीएल लिलावापूर्वी त्याने केलेलं शतक हे अधिक महत्त्वाचं ठरलं आहे.

सर्फराझ खानने मिळालेल्या वेळेत त्याच्या फिटनेसवर कमालीची मेहनत घेतली. सर्फराझने त्याचं वजन घटवलं आणि सर्वांनाच चकित केलं. सर्फराझचा फिटनेस व त्याचं शतक हे आयपीएल लिलावापूर्वी त्याच्या दृष्टीने महत्त्वाचं असणार आहे. आयपीएल २०२३ नंतर दिल्ली कॅपिटल्सने सर्फराझला रिलीज केलं आणि तो अनसोल्ड राहिला. यावेळी, अनेक फ्रँचायझींकडे मोठी पर्स आहे आणि ते मधल्या फळीत आक्रमक भारतीय फलंदाजांच्या शोधात आहेत, जिथे सर्फराझ अगदी फिट बसू शकतो.