Sarfaraz Khan Fifty Record in History of IPL: आयपीएल २०२६ ची सुरूवात चेन्नई सुपर किंग्स संघासाठी निराशाजनक झाली आहे. सीएसकेला सलग तीन पराभवांना सामोरं जावं लागलं. पण यादरम्यान सर्फराझ खानची तिन्ही सामन्यांमधील कामगिरी संघासाठी दिलासादायक ठरली. सर्फराझ खानने आरसीबीविरूद्ध सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं. या अर्धशतकासह त्याने आयपीएल इतिहासात मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना २५० धावांचा डोंगर उभारला. यासह प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्सचा संघ १९.४ षटकांत २०७ धावांवर सर्वबाद झाला. चेन्नईने हा सामना गमावला असला तरी संघाच्या फलंदाजी विभागाने २०० अधिक धावांचा डोंगर उभारत आपली चमकदेखील दाखवली. याशिवाय सर्फराझ खानने पॉवरप्लेमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरत आयपीएलमध्ये इतिहास घडवला.
सर्फराझ खान चिन्नास्वामी स्टेडियममध्ये धावांचा पाऊस पाडतो. २०१५ मध्ये आरसीबीकडून खेळताना त्याने नाबाद ४५ धावा करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला २०० धावांचा पल्ला गाठण्यात मदत केली होती. पावसामुळे तो सामना रद्द करण्यात आला होता. अकरा वर्षांनंतर, सर्फराझ त्याच मैदानावर परतला आणि यावेळी आरसीबीविरुद्धच त्याने आपली दुसरी सर्वोच्च आयपीएल धावसंख्या नोंदवली.
सर्फराझ खानने इतिहास घडवला
धावांचा पाठलाग करताना सीएसकेची सुरूवात खूपच खराब झाली. त्यांचे पहिले तीन फलंदाज, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड आणि आयुष म्हात्रे, यांनी मिळून केवळ १७ धावा केल्या. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत सर्फराझने संघाचा डाव सावरला आणि २०० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने अर्धशतक झळकावलं. सीएसकेने सर्फराझच्या खेळीमुळे अवघ्या १९ चेंडूंमध्ये ३ बाद ३० धावांवरून ३ बाद ७७ धावा अशी मजल मारली. त्याच्या या खेळीने एक मोठा आयपीएल विक्रमही रचला. आयपीएलमध्ये चौथ्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना पहिल्या सहा षटकांत अर्धशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला.
आरसीबीविरुद्ध सर्फराझचं हे दुसरं आयपीएल अर्धशतक होतं. त्याने यापूर्वी ६ एप्रिल २०१९ रोजी पंजाब किंग्ससाठी आपलं पहिलं अर्धशतक झळकावलं होतं. सर्फराझने तब्बल २,५५६ दिवसांनंतर, आपलं दुसरं अर्धशतक पूर्ण केलं. यामुळे, दोन आयपीएल अर्धशतकांमध्ये सर्वाधिक कालावधी लोटलेल्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर पहिल्या स्थानी कृणाल पंड्या आहे. ज्याने ३२६९ दिवसांच्या फरकानंतर दुसरं आयपीएल अर्धशतक झळकावलं होतं.
