नवी दिल्ली : ‘कदाचित संघात माझी जागा बनत नसेल, पण मी सर्वस्व पणाला लावून मी लढत राहीन.’ मुंबईकर फलंदाज सर्फराज खानने काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर हा संदेश लिहिला होता. भारतीय संघातून बाहेर असल्याने निराश झालेल्या सर्फराजने हार न मानण्याचा आणि लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला होता. दोन वर्षांपासून तंदुरुस्ती आणि फलंदाजीवर घेतलेल्या मेहनतीवर त्याला पूर्ण विश्वास होता. अखेर त्याचा संघर्ष फळाला आला. साई सुदर्शनला झालेल्या दुखापतीमुळे बदली खेळाडू म्हणून सर्फराजला श्रीलंकेविरुद्ध १५ ऑगस्टपासून सुरू होणार्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले.
सर्फराजसाठी पुनरागमनाचा क्षण अत्यंत योग्य वेळी आल्याचे म्हटले जात आहे. १७ किलो वजन कमी करणे, तंदुरुस्तीवर मेहनत घेणे, फिरकीविरुद्धचा खेळ अधिक भक्कम करणे आणि मुंबईत पावसामुळे सरावात अडथळे येत असताना थेट काश्मीर गाठून तासनतास नेट्समध्ये घाम गाळणे, या गेल्या दीड-दोन वर्षांतील मेहनतीचेच सर्फराजला फळ मिळाले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना वजन जास्त असल्याची टीका सर्फराजला सातत्याने सहन करावी लागली. मात्र, रणजी करंडकात द्विशतके आणि त्रिशतक झळकावून आपल्या फलंदाजीची ताकद दाखवणार्या सर्फराजने प्रत्येक वेळी मैदानावरच उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आता त्याचा अधिक सडपातळ आणि तंदुरुस्त ‘अवतार’ पाहायला मिळत आहे.
सर्फराजला भारतीय संघातून वगळण्यात आले, तेव्हा त्याच्यासाठी तो मोठा धक्का होता. २०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याने एका डावात १५० धावांची दिमाखदार खेळी केली होती. मात्र, त्याच मालिकेत नंतर आलेल्या अपयशामुळे त्याला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. विशेष म्हणजे, त्या मालिकेत भारतीय संघातील अन्यही फलंदाज अपयशी ठरले होते. तरीही केवळ सर्फराजलाच संघातील स्थान गमवावे लागले. त्यानंतर इंग्लंड दौर्यातील ‘अ’ संघाच्या सामन्यात सर्फराजने ९२ धावांची खेळी केली. तसेच भारत विरुद्ध भारत ‘अ’ अशा सराव सामन्यात त्याने शतकही झळकावले. तरीही तो राष्ट्रीय संघापासून दूरच राहिला. भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर झालेला निराशाजनक पराभव आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीने मात्र बदलाचे संकेत दिले.
फिरकीविरुद्ध सक्षम
सूत्रांच्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेतील गुवाहाटी येथील दुसर्या कसोटीपूर्वी संघ व्यवस्थापनाने सर्फराजच्या नावाबाबत चौकशी केली होती. मात्र, त्यावेळी निवड समितीची त्याला पुन्हा संघात घेण्याची तयारी नव्हती. आता श्रीलंकेतील फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या लक्षात घेऊन सर्फराजला संधी देणे निवड समितीला भाग पडले आहे. सध्याच्या भारतीय संघात कर्णधार शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्यानंतर सर्फराजलाच फिरकी गोलंदाजीविरुद्ध सर्वांत सक्षम फलंदाज मानले जाते. आता तो सहाव्या क्रमांकासाठी दावेदारी उपस्थित करणे अपेक्षित आहे.
मुंबईत पावसाचा अडथळा; काश्मीरमध्ये तासनतास सराव
’ मुंबईत पावसामुळे नियमित सरावात अडथळे येत असल्याने सर्फराजने थेट काश्मीर गाठले. श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर त्याने फलंदाजीचा तासनतास सराव केला. नेट्समध्ये गोलंदाजांचा सामना करण्यासह जम्मू-काश्मीरच्या काही खेळाडूंबरोबरही त्याने सराव केला.
’ ‘आयपीएल’नंतर सर्फराज मुंबई ट्वेन्टी-२० लीगमध्ये आकाश टायगर्स वेस्टर्न मुंबई सबर्ब्स संघाकडून खेळला. या स्पर्धेत त्याने काही आक्रमक आणि प्रभावी खेळी केल्या. मात्र, पावसाळा सुरू झाल्यानंतर त्याने प्रशिक्षणासाठी काश्मीरची वाट धरली.
’ याशिवाय मुंबई क्रिकेट संघटनेच्या ‘बीकेसी’ येथील इनडोअर सुविधेतील ॲस्ट्रो टर्फवर त्याने कौशल्यविकासाचा सराव केला. कुर्ला परिसरातील खासगी प्रशिक्षण सुविधांचाही त्याने वापर केला.
’ फलंदाजीसाठी कठीण असलेल्या लाल मातीच्या खेळपट्ट्यांवर प्रदीर्घ वेळ फलंदाजी करून विशेषत: फिरकी गोलंदाजांविरुद्ध आपला खेळ अधिक मजबूत करण्याचा सर्फराजचा प्रयत्न होता.
जुरेलशी स्पर्धा?
सर्फराजच्या पुनरागमनामुळे ध्रुव जुरेलच्या स्थानाला धोका निर्माण झाला आहे. जुरेल गेल्या काही काळापासून फिरकी गोलंदाजीविरुद्ध अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे सहाव्या क्रमांकासाठी सर्फराज आणि जुरेल यांच्यात स्पर्धा असू शकेल. जुरेल गेल्या महिन्यात भारत ‘अ’ संघाचा कर्णधार म्हणून श्रीलंकेत गेला होता. दोन ‘अ’ कसोटी सामन्यांमध्ये त्याने एक मोठे शतक आणि एक अर्धशतक झळकावले. मात्र, नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात तो ऑफ-स्पिनरविरुद्ध बचावात्मक फटका खेळताना बाद झाला. याआधी दक्षिण आफ्रिकेचा ऑफ-स्पिनर सायमन हार्मरने भारतात झालेल्या मालिकेत जुरेलला चार डावांत तब्बल तीन वेळा बाद केले होते. याउलट सर्फराज फिरकीविरुद्धचा सक्षम फलंदाज मानला जातो. पारंपरिक स्वीपबरोबरच रिव्हर्स स्वीप खेळण्याची त्याची क्षमता विशेष उल्लेखनीय आहे. श्रीलंकेच्या फिरकीला सामोरे जाताना ही क्षमता भारतासाठी महत्त्वाची ठरू शकते.
