Sarfaraz Khan Double Century In Ranji Trophy: भारतीय कसोटी संघातील मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खानला जेव्हा जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्याने संधीचं सोनं करून धावांचा पाऊस पाडला. पण एकदा संघाबाहेर पडल्यानंतर तो पुन्हा भारतीय संघात पुनरागमन करू शकलेला नाही. भारतीय कसोटी संघात अनेक बदल केले गेले, पण सर्फराज खानला संघात स्थान दिलं गेलं नाही. फिटनेसचं कारण देऊन संघाबाहेर केल्यानंतर त्याने आपल्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली. आता फलंदाजीतही सर्फराज खानचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. रणजी ट्रॉफीत हैदराबादविरूद्ध खेळताना त्याने दमदार द्विशतकी खेळी केली आहे.

सर्फराज खानने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीत धावांचा पाऊस पाडून निवडकर्त्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता रणजी ट्रॉफीतही त्याने दमदार द्विशतक झळकावलं आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना सुरूवात झाली आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये मुंबई विरूद्ध हैदराबाद सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात मुंबईने ५०० धावांचा पल्ला गाठला आहे. यादरम्यान सर्फराज खानने २१९ चेंडूंचा सामना करत १०३ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना २२७ धावांची खेळी केली आहे. त्याने २०६ चेंडूत आपलं द्विशतक पूर्ण केलं. यादरम्यान त्याने १९ चौकार आणि ९ षटकार खेचले. त्याला साथ देत सिद्धेश लाडने १०४ धावांची खेळी केली.

सर्फराज खानचा दमदार फॉर्म

भारतीय संघातून बाहेर असलेल्या सर्फराजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मिळेल त्या संधीचा फायदा घेत तिन्ही फॉरमॅटमध्ये शतकं झळकावली आहेत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत आसामविरूद्ध फलंदाजी करताना त्याने ४७ चेंडूंचा सामना करत १०० धावांची दमदार शतकी खेळी केली होती. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत गोवाविरूद्ध फलंदाजी करताना त्याने ७५ चेंडूत १५७ धावा चोपल्या होत्या. आता रणजी ट्रॉफीतही त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे.

हे द्विशतक सर्फराजसाठी खास ठरलं आहे. कारण या द्विशतकासह त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना त्याने ६४.३ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मुख्य बाब म्हणजे, २१ व्या शतकात पदार्पण करणाऱ्या कुठल्याही फलंदाजाने या सरासरीने फलंदाजी करून ५००० धावांचा पल्ला गाठला नव्हता.

या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईकडून सिद्धेश लाडने १०४ धावांची खेळी केली. तर सर्फराज खानने २२७ धावा केल्या. तर आकाश पारकरने ७५ धावांची खेळी केली. मुंबईने ८ गडी बाद ५३३ धावा केल्या आहेत.