Sarfaraz Khan Test Comeback Weight Loss: मोठ्या प्रतिक्षेनंतर सर्फराझ खानला भारताच्या कसोटी संघात पुनरागमनाची अखेर संधी मिळाली. २ वर्षांनंतर सर्फराझची टीम इंडियात निवड करण्यात आली. सर्फराझ खानला दुखापत झालेल्या साई सुदर्शनच्या जागी संघात सामील केलं आहे. भारतीय संघात संधी मिळत नसली तरी सर्फराझ खान व त्याच्या वडिलांनी सराव मात्र थांबवला नाही. सर्फराझ खानने तब्बल १७ किलो वजन कमी करत कसा सराव केला, हे समोर आलं आहे.

भारताच्या कसोटी संघात पुनरागमन होण्याच्या काही दिवस आधी सर्फराझ खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. “मी कदाचित या चौकटीत बसत नसेन, पण माझ्याकडचं सर्व काही पणाला लावून लढेन,” असं त्यात लिहिलं होतं. या भावुक पोस्टमधून सर्फराझची जिद्द, आत्मविश्वास मात्र ठळकपणे दिसत होता. गेली दोन वर्षे वाट पाहत असलेल्या सर्फराझला अखेर श्रीलंकेविरुद्धच्या १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळालं.

मुंबईकर सर्फराझने गेल्या दीड वर्षांत स्वतःमध्ये मोठा बदल घडवून आणत तब्बल १७ किलो वजन कमी केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तो थोडा फिट नसल्याचं अनेकदा चर्चेत दिसलं. अगदी रणजी ट्रॉफीत त्रिशतक झळकावल्यानंतरही ही चर्चा कायम होती. आता मात्र सर्फराझ अधिक फिट आणि दिसत आहे आणि त्याचा फायदा विशेषतः टी-२० क्रिकेटमध्ये स्पष्टपणे जाणवू लागला आहे.

हेही वाचा

फक्त फिटनेसच नाही, तर टेक्निकमध्येही त्याने मोठी मेहनत घेतली. मुंबईतील सततच्या पावसामुळे नियमित सराव शक्य होत नसल्याने त्याने काश्मीरमधील शेर-ए-कश्मीर स्टेडियमवर तासन् तास सराव करून आपल्या खेळात सातत्याने सुधारणा केली. २०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत अपयशी ठरल्यानंतर त्याला संघाबाहेर करण्यात आलं होतं आणि तो निर्णय त्याच्यासाठी पचवणं अत्यंत कठीण होतं. त्या मालिकेत जवळपास सर्वच फलंदाज अपयशी ठरले होते, पण संघाबाहेर पडण्याची किंमत मात्र फक्त २८ वर्षीय सर्फराझ खानलाच मोजावी लागली होती. पण सर्फराझने हार न मानता सातत्याने सराव करत मोठ्या खेळी साकारल्या.

लाल मातीच्या टर्निंग विकेट्सवर कसून सराव

आयपीएलनंतर सर्फराझ खानने मुंबई टी-२० लीगमध्ये भाग घेतला आणि आकाश टायगर्स वेस्टर्न मुंबई सबर्ब्सकडून खेळताना काही स्फोटक खेळी साकारल्या. मात्र मुंबईत मान्सून सुरू होताच तो काश्मीरला पोहोचला. तिथे काही काळ मुक्काम करून त्याने नेट गोलंदाजांसोबत तसेच जम्मू-काश्मीर राज्य संघातील काही खेळाडूंविरुद्धही सराव केला.

त्याशिवाय बीकेसी येथील एमसीए इनडोअर सुविधेत अॅस्ट्रो टर्फ विकेटवर कौशल्याधारित सराव केला. एवढ्यावरच न थांबता, कुर्ल्याजवळील काही खासगी सुविधाही भाड्याने घेऊन त्याने कसून फलंदाजीचा सराव केला. विशेष म्हणजे हा सराव वापरलेल्या आणि जाणीवपूर्वक कमी तयार केलेल्या लाल मातीच्या टर्निंग विकेट्सवर करण्यात आला, जेणेकरून संथ आणि फिरकी गोलंदाजांविरुद्धचा त्याची कामगिरी सातत्याने राहील.

संघाबाहेर पडल्यानंतर सर्फराझ खानने हार मानली नाही. तो इंग्लंडला गेला आणि इंग्लंड लायन्सविरुद्धच्या अनधिकृत कसोटीत इंडिया ‘अ’साठी ९२ धावा केल्या. त्याशिवाय बेकेनहॅम येथे झालेल्या भारत विरुद्ध इंडिया ‘अ’ या सराव सामन्यातही त्याने शतक झळकावलं. तरीही भारतीय कसोटी संघात पुनरागमन शक्य दिसत नव्हतं. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर परिस्थिती बदलू लागली. सूत्रांच्या मते, गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम मॅनेजमेंटने सर्फराझबाबत चौकशी केली होती. मात्र निवड समिती त्याला पुन्हा संघात घेण्यास त्या वेळी तयार नव्हती.

दरम्यान साई सुदर्शनच्या अनुपस्थितीत त्याचा सर्वप्रथम विचार करण्यात आला. निवड समितीसमोर खरं पाहता तीन पर्याय होते, पहिला पर्याय ऋतुराज गायकवाड ज्याची प्रथम श्रेणीमधील सरासरी कमीलीची होती. तिसरा पर्याय होता अनुभवहीन शेख रशीद, जो प्रामुख्याने तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा फलंदाज मानला जातो. तिसरा आणि सर्वात तर्कसंगत पर्याय सर्फराझ खानच होता. सध्याच्या भारतीय संघात शुबमन गिल आणि ऋषभ पंतनंतर फिरकी गोलंदाजीविरुद्ध सर्वात प्रभावी फलंदाज म्हणून सर्फराझकडे पाहिलं जातं.