Sarfaraz Khan Catch: आयपीएल २०२६ स्पर्धेतील १८ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. चेपॉकच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने पहिल्या डावात २१२ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सलाही चांगली सुरूवात मिळाली होती. पण अक्षर पावरप्लेमध्ये दोन्ही सलामीवीर फलंदाज माघारी परतले. त्यानंतर सर्फराज खानने हवेत डाईव्ह मारून भन्नाट कॅच घेतला आणि कर्णधार अक्षर पटेलला बाद करत माघारी धाडलं. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सर्फराज खानला आधी फिल्डिंगमुळे ट्रोल केलं जात होतं. फलंदाजीत दमदार काममगिरी करून, फिटनेसमुळे त्याला संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. आता त्याने फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम त्याच्या फलंदाजीवर क्षेत्ररक्षणावर दिसून आला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात त्याने ग्लेन फिलिप्स स्टाईल डाईव्ह मारून भन्नाट झेल घेतला आहे.
तर झाले असे की, दिल्लीचा संघ २१३ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आला होता. पावरप्लेच्या षटकांमध्ये सलामी जोडी माघारी परतली होती. त्यामुळे कर्णधार अक्षर पटेलवर दबाव होता. त्यावेळी ७ वे षटक टाकण्यासाठी वेगवान गोलंदाज डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज गुरजपनीत सिंग गोलंदाजीला आला. या षटकातील पहिला चेंडू त्याने शॉर्ट टाकला. या चेंडूवर अक्षर पटेलने कट शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी पॉईंटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या सर्फराज खानने डाईव्ह मारून अविश्वसनीय झेल घेतला.
चेन्नईने दिले २१३ धावांचे आव्हान
या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून संजू सॅमसनने सर्वाधिक ११५ धावांची खेळी केली. हे शतक संजू सॅमसनसाठी अतिशय खास ठरलं. कारण चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना झळकावलेलं हे त्याचं पहिलंच शतक आहे. यासह तो ३ वेगवेगळ्या संघांकडून खेळताना शतक झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. याआधी त्याने दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळताना शतक झळकावलं होतं. तर ऋतुराज गायकवाडने १५ धावा केल्या. आयुष म्हात्रे ५९ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. तर शिवम दुबेने नाबाद २० धावा करून संघाची धावसंख्या २१२ धावावंर पोहोचवली.
