सर्वेश बिरामणे याने १२ वर्षांखालील गटाच्या २७ व्या प्रवीण चषक राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेतील मुलांच्या विभागात अजिंक्यपदावर मोहोर नोंदविली. मुलींमध्ये अनिशा शेवते हिला विजेतेपद मिळाले. हिलसाईड जिमखाना येथे झालेल्या या स्पर्धेत सर्वेश याने अंतिम लढतीत कोल्हापूरच्या प्रसाद इंगळे याचा ६-३, ६-४ असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला. अनिशा हिलादेखील अंतिम फेरीत विजय मिळविताना फारशी अडचण आली नाही. तिने तन्वी नायर हिला ६-२, ६-४ असे पराभूत केले.
सर्वेश याने प्रसादविरुद्ध फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा सुरेख खेळ केला. त्याने पहिल्या सेटमध्ये सातव्या व नवव्या गेमच्या वेळी सव्‍‌र्हिसब्रेक नोंदविला. त्याने बेसलाईनवरुन व्हॉलिजचाही कल्पकतेने उपयोग केला. दुसऱ्या गेममध्ये प्रसादला सूर गवसला. त्याने पासिंग शॉट्सचा खेळ करीत सामन्यातील रंगत वाढविली. दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सव्‍‌र्हिस राखल्यानंतर ४-४ अशी बरोबरी झाली. नवव्या गेममध्ये प्रसादला सव्‍‌र्हिसवर नियंत्रण राखता आले नाही. त्याचा फायदा घेत सर्वेशने सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. याच ब्रेकच्या आधारे त्याने हा सेट घेत सामनाही जिंकला. तो पीवायसी जिमखाना येथे हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
मुलींच्या अंतिम सामन्यात अनिशा हिने क्रॉसकोर्ट फटक्यांचा सुरेख खेळ केला. तिने पहिल्या सेटमध्ये दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. दुसऱ्या सेटमध्ये तन्वी हिने अनिशाला चांगली लढत दिली. मात्र तिने स्वत:च्या सव्‍‌र्हिसवर एक गेम गमावली. त्याचा फायदा घेत अनिशाने हा सेट विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ती संदीप कीर्तने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.