Sarvesh Kushare Wins Sliver Medal in Asian Games 2026: राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश अनिल कुशारेने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास घडवला आहे. महाराष्ट्राच्या ३१ वर्षीय खेळाडूने आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकावत भारताची तब्बल ५६ वर्षांची प्रतीक्षा संपवली. १९७० नंतर आता भारताला त्याने पुन्हा एकदा उंच उडीमध्ये पदक मिळवून दिलं आहे.

सर्वेशने अंतिम फेरीत २.२५ मीटरची सर्वोत्तम उडी नोंदवत रौप्यपदकावर नाव कोरलं. त्याची उडी चायनीज तैपेईच्या चाओ-हुसान फू याच्याइतकीच म्हणजे २.२५ मीटर होती. मात्र, काउंटबॅकच्या नियमानुसार फूने सुवर्णपदक पटकावलं आणि सर्वेशला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील उंच उडीमध्ये पदक जिंकणारा सर्वेश हा भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे. या पदकासह आशियाई क्रीडा स्पर्धेतील उंच उडीमध्ये भारताच्या पदकांची संख्या चार झाली आहे. यापूर्वी भारताला या स्पर्धेत शेवटचं पदक १९७० मध्ये मिळालं होतं. त्यावेळी भीम सिंह यांनी कांस्यपदक जिंकलं होतं. याआधी भारताने उंच उडीमध्ये दोन सुवर्णपदकंही जिंकली आहेत. १९६६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भीम सिंह यांनी सुवर्णपदक पटकावलं होतं, तर 19१९५४ मध्ये अजित सिंह भल्ला यांनी भारताला या प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.

नाशिकच्या लहानश्या गावातून सुरू झालेला प्रवास अनेक मोठमोठे विक्रम करत सर्वांच्या परिचयाचा झालेला सर्वेश कुशारे सातत्याने आपली कामगिरी छाप पाडत आहे. सर्वेशचे वडील अनिल कुशारे हे शेतकरी. अनिल कुशारे हे कांदा उत्पादक आहेत. आपल्या मुलाने सिव्हिल इंजिनियर व्हावे, अशी त्यांची इच्छा. परंतु, सर्वेशला मात्र उंच उडी या क्रीडा प्रकाराने आकर्षित केलं होतं. नाशिक विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत उंच उडीत सर्वेशने तृतीय क्रमांक मिळवल्यावर क्रीडा प्रशिक्षक रावसाहेब जाधव हे त्याच्या कामगिरीने प्रभावित झाले आणि २०१० पासून त्याच्या कारकिर्दीला सुरूवात झाली, जी अविरतपणे सुरू आहे.

पारुल चौधरीने राष्ट्रीय विक्रम मोडत पटकावलं कांस्यपदक

भारताची स्टार धावपटू पारुल चौधरीने महिलांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेसमध्ये शानदार कामगिरी करत कांस्यपदकावर नाव कोरलं. पारुलने ९:०८.६७ सेकंदांची वेळ नोंदवत शर्यत पूर्ण केली आणि त्याचबरोबर स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला. या शर्यतीत बहरीनच्या विनफ्रेड यावीने ९:०४.३६ सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावलं आणि नवा गेम्स रेकॉर्ड प्रस्थापित केला. कझाकस्तानच्या नोराह जेरुटोने ९:०६.८२ सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकलं.