टोक्यो : भारताच्या सतीश कुमारने (+९१ किलो) दुखापतीवर मात करीत उझबेकिस्तानच्या विश्वविजेत्या बखोदिर जालोलोव्हविरुद्ध झुंजार लढत दिली. परंतु बखोदिरविरुद्ध त्याचा निभाव न लागल्याने ऑलिम्पिक बॉक्सिंगच्या उपांत्यपूर्व फेरीत सतीशचे आव्हान रविवारी संपुष्टात आले.

उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कपाळावर आणि हनुवटीवर झालेल्या दुखापतींवर मात करीत सतीशने बखोदिरचा त्वेषाने सामना केला. परंतु बखोदिरने ५-० असे निर्विवादपणे सामन्यावर वर्चस्व गाजवले.

दोन वेळा आशियाई क्रीडा स्पध्रेत कांस्यपदके आणि बरीच राष्ट्रीय जेतेपदे नावावर असणाऱ्या सतीशने ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवून इतिहास घडवला होता. कारण उच्च वजनी गटातून (सुपर हेव्हीवेट) ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला तो पहिला भारतीय बॉक्सिंगपटू होता.

सेनादलात कार्यरत असलेला ३२ वर्षीय सतीश कारकीर्दीमधील सर्वात महत्त्वाच्या लढतीला आत्मविश्वासाने सामोरा गेला.

माझ्या पत्नीने मला दूरध्वनी करून लढत खेळू नको, असे बजावले. माझ्या वडिलांनीही तेच सांगितले. पण माझा सामना खेळण्याचा निर्णय पक्का होता. पराभूत झाल्यानंतरही सर्व जण माझे कौतुक करत आहेत, यावर विश्वास बसत नाही. माझ्या हनुवटीला आणि कपाळाला दुखापत झाली आहे. परंतु देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकण्याच्या इर्षेने मी रिंगणात उतरलो. आता पुढील ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न नक्कीच पूर्ण करेन.

– सतीश कुमार