सलामीच्या लढतीत दिमाखदार विजयानंतर दुसऱ्या लढतीत पराभवाला सामोरे जाण्याची नामुष्की जर्मनीवर ओढवते, असे फिफा विश्वचषकाचा इतिहास सांगतो. यंदाच्या विश्वचषकातील सर्वात तुल्यबळ गट (ग्रूप ऑफ डेथ) असे वर्णन होणाऱ्या ‘ग’ गटाच्या लढतीत जर्मनीला घानाविरुद्ध नवा इतिहास घडवण्याची संधी आहे.   
२०१०च्या विश्वचषकात जर्मनीने सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला होता, मात्र दुसऱ्या लढतीत सर्बियाने त्यांच्यावर अनपेक्षित विजय मिळवला होता. यंदाही जर्मनीने पोर्तुगालवर दणदणीत विजयासह दणक्यात सुरुवात केली होती. दुसऱ्या लढतीत त्यांच्यासमोर घानाचे आव्हान आहे. या लढतीत विजयासह बाद फेरी गाठण्याचे जर्मनीचे मनसुबे आहेत. घानाला अमेरिकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यातून सावरत जर्मनीचा झंझावात रोखण्याचे खडतर आव्हान त्यांच्यासमोर आहे. या लढतीतही पराभव झाल्यास घानाला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागू शकतो.
बचावफळीतील महत्त्वपूर्ण खेळाडू मॅट हमेल्सला झालेली दुखापत ही जर्मनीसाठी चिंतेची बाब आहे. हमेल्सने संघासह सराव केला नाही. सामन्यापूर्वी त्याच्या समावेशाविषयी निर्णय घेण्यात येणार आहे. जर्मनीचा संघ पोर्तुगालविरुद्धची व्यूहरचना कायम राखण्याची शक्यता आहे.    
अमेरिकेविरुद्धच्या पराभवानंतर घानाच्या खेळाडूंनी प्रशिक्षक क्वेसी अपीहा यांच्याविरुद्ध बंड केल्याच्या वृत्ताचा घाना संघव्यवस्थापनाने इन्कार केला आहे. मायकेल इसियेन दुखापतीतून सावरला असून, ते जर्मनीविरुद्ध खेळणार असल्याने घानाचा संघ मजबूत झाला आहे. घाना संघाने २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. कॅमेरून, अल्जेरिया, नायजेरिया, आयव्हरी कोस्ट यांच्या तुलनेत आफ्रिका खंडातील घाना संघाकडून चाहत्यांच्या अपेक्षा आहेत.

गोलपोस्ट
चार वर्षांपूर्वी विश्वचषकात खेळलेली दुसरी लढत आमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. आम्ही सुरुवात चांगली केली होती, मात्र नंतर आम्ही लय गमावली. घानाविरुद्धचा सामना आम्हाला अत्यंत गांभीर्याने घ्यावा लागेल.
– पेर मर्टेसॅकर, जर्मनी

जर्मनी मातब्बर संघ आहे. त्यांच्याविरुद्धची लढत खडतरच असणार आहे. आम्ही चांगला सांघिक खेळ करायला हवा. मैदानावर काय होईल, हे मी सांगू शकत नाही. मात्र फुटबॉलमध्ये अनेकदा आश्चर्यकारक गोष्टी घडतात. जर्मनीचे दडपण घेण्यापेक्षा नैसर्गिक खेळ करणे आवश्यक आहे.
– असामोह ग्यान, घाना

आमनेसामने
सामने : १
जर्मनी : विजय १
सामना क्र. र९
‘ग’ गट : जर्मनी विरुद्ध घाना
स्थळ : फोर्टालेझा, इस्टाडिओ कॅस्टलो  ल्ल वेळ : मध्यरात्री १२.३० वाजता
लक्षवेधी खेळाडू
थॉमस म्युलर (जर्मनी) : संतुलित आणि परिपक्व खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या थॉमस म्युलरने पोर्तुगालविरुद्धच्या लढतीत हॅट्ट्रिक नोंदवत संघाला विजय मिळवून दिला. घानाविरुद्धही म्युलरवरच जर्मनीच्या आशा केंद्रित झाल्या आहेत. मध्यरक्षणात वाकबगार असलेल्या म्युलरने आघाडीपटूच्या भूमिकेत निष्णात असल्याचे सिद्ध केले आहे.
मायकेल इसियेन (घाना) : मध्यरक्षणातला महत्त्वाचा दुवा असणाऱ्या मायकेल इसियेनवर मोठी जबाबदारी आहे. स्पर्धेतले आव्हान जिवंत राखण्यासाठी इसियेनने आपल्या कौशल्याद्वारे आघाडीपटूंकडे चेंडू कसा सोपवता येईल, याचा विचार करणे आवश्यक आहे. दुखापतीमुळे इसियेन अमेरिकेविरुद्धच्या लढतीत खेळू शकला नव्हता. घानाला त्याची अनुपस्थिती निश्चितच जाणवली. जर्मनीसारख्या आक्रमणावर भर देणाऱ्या संघाविरुद्ध इसियेनची कसोटी लागणार आहे.