भारतीय बॅडमिंटन जगतातील स्टार जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर भारताची मान अभिमानाने उंच केली आहे. अत्यंत अटीतटीच्या ठरलेल्या अंतिम सामन्यात चिनी जोडीचा पराभव करत सात्विक आणि चिरागने पहिल्यांदाच प्रतिष्ठित ‘चायना मास्टर्स २०२६’ स्पर्धेच्या जेतेपदावर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयासह त्यांनी आपल्या कारकिर्दीतील १० वे ‘बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर’ (BWF World Tour) विजेतेपदही निश्चित केले.
चीनच्या घरच्या मैदानावर पार पडलेल्या या अंतिम लढतीत भारतीय जोडीने चीनच्या हे जिटिंग आणि रेन शियांगयू या तगड्या जोडीचा ११-२१, २१-१३, २१-१७ असा पराभव केला. तब्बल ७० मिनिटे चाललेल्या या थरारक सामन्यात सात्विक आणि चिरागने आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे आणि संयमाचे प्रदर्शन केले. या विजयासह त्यांनी चिनी जोडीविरोधातील आपला ३-० असा अजेय विक्रमही कायम ठेवला आहे.
पहिल्या गेममध्ये चिनी जोडीचे वर्चस्व
सामन्याची सुरुवात भारतीय जोडीसाठी काहीशी खडतर राहिली. चिनी खेळाडूंनी आक्रमक सुरुवात करत सुरुवातीलाच ५-० अशी आघाडी घेतली. नेटजवळील जलद हालचाली आणि जोरदार स्ॅमशच्या जोरावर त्यांनी सात्विक-चिरागवर सातत्याने दबाव वाढवला. मध्यंतरापर्यंत चिनी जोडी ११-५ अशी आघाडीवर होती. भारतीय जोडीला पहिल्या गेममध्ये आपल्या लयीत येणे कठीण गेले, तर काही चुकांमुळे अवघ्या १८ मिनिटांत पहिला गेम २१-११ असा चिनी जोडीच्या नावावर झाला.
दुसऱ्या गेममध्ये सात्विक-चिरागचे पुनरागमन
पहिला गेम गमावल्यानंतर भारतीय जोडीने जबरदस्त पुनरागमन केले. दुसऱ्या गेममध्ये चिनी जोडीने २-० अशी सुरुवात केली खरी, पण सात्विक आणि चिरागने लगेचच स्कोअर ३-३ आणि नंतर ६-६ असा बरोबरीत आणला. यानंतर सामन्याचे नियंत्रण पूर्णपणे भारतीय जोडीच्या हातात आले. चिरागच्या धडाकेबाज स्ॅमशच्या बळावर मध्यंतरापर्यंत भारताने ११-७ अशी आघाडी घेतली. हीच लय कायम ठेवत सात्विक-चिरागने दुसरा गेम २१-१३ असा सहज जिंकत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.
तिसऱ्या गेममधील थरार आणि सुवर्ण क्षण
निर्णायक ठरलेल्या तिसऱ्या गेममध्ये दोन्ही जोड्यांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. चिनी खेळाडूंनी पुन्हा एकदा ४-० आणि नंतर ७-३ अशी आघाडी घेतली होती. मात्र, हार न मानणाऱ्या भारतीय जोडीने सलग गुण वसूल करत ७-७ अशी बरोबरी केली आणि मध्यंतरापर्यंत ११-९ अशी महत्त्वाची आघाडी मिळवली.
सामन्याच्या उत्तरार्धात चिनी जोडीने पुनरागमन करत स्कोअर १६-१६ आणि नंतर १७-१७ असा बरोबरीत आणला. सामना कोणाच्याही बाजूने झुकू शकत होता; अशा मोक्याच्या क्षणी सात्विक आणि चिरागने आपला संयम ढळू दिला नाही. त्यांनी सलग चार गुण मिळवत २१-१७ असा तिसरा गेम जिंकला आणि पहिल्याच मॅच पॉईंटवर विजयावर शिक्कामोर्तब केले. या ऐतिहासिक विजयासह सात्विक आणि चिरागने पुन्हा एकदा आपण जागतिक बॅडमिंटनमधील सर्वोत्तम जोड्यांपैकी एक असल्याचे सिद्ध केले आहे.
