सिंगापूर : भारताच्या सात्त्वाकिसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने रविवारी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत (सुपर ७५० दर्जा) पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मुहम्मद शोहिबुल फिकरी जोडीचा १८-२१, २१-१७, २१-१६ असा पराभव केला.
अटीतटीच्या अंतिम लढतीत पहिला गेम गमाविल्यानंतर सा्त्विवक-चिरागने आपल्या खेळाचा वेग वाढवला आणि प्रदीर्घ रॅलीजमध्ये वर्चस्व गाजवून जागतिक क्रमवारी तिसर्या स्थानावर असलेल्या इंडोनेशियाच्या जोडीचा पराभव केला.
अंतिम लढतीत भारतीय जोडीची सुरुवात संथ होती. पहिल्या गेमला दोघेही चाचपडत खेळताना दिसले. सुरुवातीच्या पिछाडीनंतर भारतीय जोडीने प्रथम बरोबरी साधली. नंतर ११-९ अशी किरकोळ आघाडी घेतली. त्यानंतर गेम १६-१६,
१७-१७, १८-१८ असा बरोबरीतच सुरू होता. मात्र, निर्णायक क्षणी झालेल्या चुकांमुळे भारतीय जोडीला पहिला गेम गमवावा लागला. दुसर्या गेमला भारतीय जोडीने गेमच्या मध्याला ११-८ आणि नंतर सलग सहा गुणांची कमाई करत आघाडी १७-८ अशी वाढवली. त्यानंतरही अखेरच्या टप्प्यात इंडोनेशियन जोडीने पिछाडी २०-१७ अशी भरून काढली. मात्र, चिरागच्या नेटवरील सुरेख खेळासमोर त्यांचा निभाव लागला नाही.
निर्णायक गेममध्येही गुणांसाठी कमालीची चुरस बघायला मिळाली. भारतीय जोडीने ६-२, ११-६ अशी आघाडी वाढवत नेली. मात्र, त्यानंतर इंडोनेशियन जोडीने सलग सहा गुण घेत पिछाडी १२-११ अशी कमी केली. या स्थितीत भारतीय जोडीने संयम गमावला नाही. भारतीय जोडी २०-१५ अशा आघाडीवर असताना स्व्हिहसला उशीर केल्यामुळे त्यांना ‘यलो कार्ड’ मिळाले. अर्थात, याचा फारसा फरक पडला नाही. भारतीय जोडीने पुढचाच गुण घेत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
दोन वर्षांनी यश…
या कामगिरीसह सा्त्विवक-चिरागने आपला दोन वर्षांपासूनचा विजेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणला. त्यांना २०२४ मध्ये थायलंड स्पर्धेतील विजेतेपदानंतर कायम अंतिम यशाने हुलकावणी दिली होती. तब्बल चार वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. सिंगापूर स्पर्धेत दुहेरीत विजेतेपद मिळवणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली.
