scorecardresearch

मलेशिया खुली बॅडिमटन स्पर्धा : सात्त्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत; प्रणॉयचे आव्हान संपुष्टात

सात्त्विक-चिराग जोडीने चीनच्या लियु यु चेन आणि ओयु झुआन या जोडीला १७-२१, २२-२०, २१-९ असे पराभूत केले

मलेशिया खुली बॅडिमटन स्पर्धा : सात्त्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत; प्रणॉयचे आव्हान संपुष्टात
फोटो- इंडियन एक्स्प्रेस(file photo) भारताची तारांकित जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी

क्वालालंपुर : भारताची तारांकित जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने पिछाडीवरून जोरदार पुनरागमन करत मलेशिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेतील (सुपर ७५० दर्जा) पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली. मात्र, पुरुष एकेरीत एच एस प्रणॉयला पराभूत व्हावे लागल्याने त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

सात्त्विक-चिराग जोडीने चीनच्या लियु यु चेन आणि ओयु झुआन या जोडीला १७-२१, २२-२०, २१-९ असे पराभूत केले. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही जोडय़ांकडून आक्रमक खेळ पाहण्यास मिळाला. चीनची जोडी पहिल्या गेममध्ये वरचढ चढली. त्यांनी भारतीय जोडीची आक्रमणे परतवून लावताना गेम २१-१७ असा जिंकत आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने चांगला खेळ केला, तरीही चीनच्या खेळाडूंनी त्यांच्यासमोर आव्हान उपस्थित केले. मात्र, सात्त्विक-चिराग जोडीने गुणांची कमाई करताना गेम २२-२० असा जिंकत सामना बरोबरीत आणला. निर्णायक गेममध्ये भारतीय जोडीने आपली हीच लय कायम राखताना चीनला पुनरागमनाची कोणतीच संधी न देता गेम २१-९ असा जिंकत सामन्यात विजय नोंदवला. पुढच्या फेरीत त्यांचा सामना चीनच्या लिआंग वेई केंग व वांग चांग जोडीशी होईल.

पुरुष एकेरीच्या सामन्यात प्रणॉयला जपानच्या कोडाई नाराओकाकडून पराभूत व्हावे लागले. प्रणॉयने ८४ मिनिटे चाललेल्या लढतीत नाराओकाकडून १६-२१, २१-१९, १०-२१ अशी हार पत्करली. सामन्यातील पहिला गेम जपानच्या खेळाडूने जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये प्रणॉयने आपला खेळ उंचावत गेम २१-१९ असा जिंकत सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या गेममध्ये मात्र, प्रणॉयला आपली ही लय कायम राखता आली नाही. नाराओकाने काही उत्कृष्ठ फटके मारत गुणांची कमाई केली आणि गेम २१-१० असा जिंकत सामन्यात विजय मिळवला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-01-2023 at 04:17 IST

संबंधित बातम्या