जागतिक मालिकेचा अंतिम टप्पा : सात्त्विक-चिराग पात्रतेचे मानकरी

या स्पर्धेतील पुरुष दुहेरीसाठी पात्र ठरणारी ही पहिलीच भारतीय जोडी ठरली आहे.

मुंबई : भारताची पुरुष दुहेरीतील आघाडीची जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी ऐतिहासिक कामगिरी करताना जागतिक मालिकेच्या अंतिम टप्पात (वर्ल्ड टूर फायनल्स) प्रवेश मिळवला. या स्पर्धेतील पुरुष दुहेरीसाठी पात्र ठरणारी ही पहिलीच भारतीय जोडी ठरली आहे.

बाली येथे १ ते ५ डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. नुकत्याच झालेल्या इंडोनेशिया खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सात्त्विक—चिरागला पराभव पत्करावा लागल्याने त्यांच्या जागतिक मालिकेच्या अंतिम टप्पातील प्रवेशाला धोका निर्माण झाला होता; परंतु अकिरा कोगा आणि तैची सैटो ही जपानी जोडीसुद्धा पराभूत झाल्याने सात्त्विक—चिराग या मानाच्या स्पर्धेसाठी पात्र ठरले.

इंडोनेशिया स्पर्धेत सात्त्विक—चिरागवर केव्हिन सुकोमुल्जो आणि मार्कस जिडीऑन या अग्रमानांकित जोडीने सरळ गेममध्ये मात केली होती. भारतीय जोडीने यंदा या स्पर्धेप्रमाणेच स्विस खुल्या स्पर्धेचीही उपांत्य फेरी गाठली होती. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या या जोडीला दमदार कामगिरी करूनही नशीबाने साथ न दिल्यामुळे पुढे आगेकूच करता आली नाही.

अंतिम टप्प्यासाठी पात्र ठरलेले भारतीय खेळाडू

’ एकेरी : किदम्बी श्रीकांत (पुरुष), लक्ष्य सेन (पुरुष), पी. व्ही. सिंधू (महिला)

’ दुहेरी : सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी (पुरुष), अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी (महिला)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Satwiksairaj rankireddy chirag shetty qualify for world series zws