scorecardresearch

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: पंजाबला नमवत सौराष्ट्रचा उपांत्य फेरीत प्रवेश

पार्थ भूतच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर सौराष्ट्रने पहिल्या डावातील पिछाडीनंतर दमदार पुनरागमन करताना पंजाबवर ७१ धावांनी मात करत रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

parth bhut
(पार्थ भूत)

पहिल्या डावातील पिछाडीनंतरही ७१ धावांनी विजयी

वृत्तसंस्था, राजकोट

पार्थ भूतच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर सौराष्ट्रने पहिल्या डावातील पिछाडीनंतर दमदार पुनरागमन करताना पंजाबवर ७१ धावांनी मात करत रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सौराष्ट्रने विजयासाठी पंजाबपुढे २५२ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना पंजाबचा दुसरा डाव १८० धावांत आटोपला. सौराष्ट्रच्या विजयात भूतची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरली. भूतने पहिल्या डावात नाबाद १११ आणि दुसऱ्या डावात ५१ धावांची खेळी साकारली. मग डावखुऱ्या फिरकीने पंजाबच्या फलंदाजांना अडचणीत टाकताना भूतने दुसऱ्या डावात ८९ धावांत ५ गडी बाद केले. त्याने सामन्यात एकूण ८ बळी मिळवले.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सौराष्ट्रला पहिल्या डावात ३०३ धावांचीच मजल मारता आली होती. मग पंजाबने ४३१ धावा करत पहिल्या डावात १२८ धावांची आघाडी मिळवली होती. सौराष्ट्रने दुसऱ्या डावात ३७९ धावा केल्या आणि विजयासाठी पंजाबपुढे २५२ धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात पंजाबची चौथ्या दिवसअखेर २ बाद ५२ अशी स्थिती होती.पाचव्या दिवशी कर्णधार मनदीप सिंग (१२८ चेंडूंत ४५) आणि पुखराज मान (११९ चेंडूंत ४२) यांचा अपवाद वगळताना पंजाबच्या फलंदाजांचा सौराष्ट्रच्या फिरकीपटूंपुढे निभाव लागला नाही. पाच गडी बाद करणाऱ्या भूतला डावखुरा फिरकीपटू धर्मेद्रसिंह जडेजा (३/५६) आणि ऑफ-स्पिनर युवराजसिंह डोडिया (२/३५) यांची उत्तम साथ लाभली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाल्याने नियमित कर्णधार जयदेव उनाडकट, चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जडेजा हे सौराष्ट्रचे तीन प्रमुख खेळाडू या सामन्यात खेळू शकले नाहीत. मात्र, इतर खेळाडूंनी आपला खेळ उंचावत सौराष्ट्रला उपांत्य फेरीत पोहोचवले.

संक्षिप्त धावफलक
सौराष्ट्र (पहिला डाव) : ३०३
पंजाब (पहिला डाव) : ४३१
सौराष्ट्र (दुसरा डाव) : ३७९
पंजाब (दुसरा डाव) : ८९.१ षटकांत सर्व बाद १८० (मनदीप सिंग ४५, पुखराज मान ४२, अनमोलप्रीत सिंग २६; पार्थ भूत ५/५६, धर्मेद्रसिंह जडेजा ३/५६, युवराजसिंह डोडिया २/३५)

उपांत्य फेरीचे सामने
मध्य प्रदेश वि. बंगाल
कर्नाटक वि. सौराष्ट्र
(८ ते १२ फेब्रुवारी)

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 03:40 IST