कोलकाता : कर्णधार जयदेव उनाडकटच्या (६/८५) भेदक गोलंदाजीच्या जोरावर सौराष्ट्रने रविवारी दुसऱ्यांदा रणजी करंडकावर नाव कोरले. अंतिम लढतीत चौथ्याच दिवशी सौराष्ट्रने यजमान बंगालचा नऊ गडी राखून पराभव केला. दोन वर्षांपूर्वी सौराष्ट्रने बंगालला नमवूनच पहिल्यांदा रणजी करंडक पटकावला होता.
घरच्या मैदानावर खेळताना तीन दशकांनंतर विजेतेपदाची आणि दोन वर्षांपूर्वीच्या अंतिम सामन्यातील पराभवाची परतफेड करण्याचा बंगालचा मानस होता. बंगालचे वेगवान गोलंदाज यंदाच्या हंगामात भरात होते. त्यामुळे आपल्या गोलंदाजांना साजेशी खेळपट्टी बंगालने तयार केली. खेळपट्टीवर अधिक गवत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, हाच निर्णय त्यांना महागात पडला. अनुभवी उनाडकट आणि चेतन सकारिया या सौराष्ट्रच्या वेगवान गोलंदाजांनी बंगालच्या फलंदाजांना निष्प्रभ केले.
पहिल्या डावात २३० धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर बंगालने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेरीस ४ बाद १६९ अशी मजल मारली होती. मात्र, चौथ्या दिवशी त्यांचा दुसरा डाव २४१ धावांतच आटोपला. त्यामुळे विजयासाठी सौराष्ट्रला केवळ १२ धावांचे आव्हान मिळाले. सौराष्ट्रने सलामीचा फलंदाज जय गोहिलला (०) गमावले; परंतु त्यानंतर सौराष्ट्रने २.४ षटकांतच १ बाद १४ धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केले. बंगालचे १९९० नंतर पहिल्यांदा रणजी करंडक पटकावण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.