रॉटरडॅम (नेदरलँड्स) : हिमाचल प्रदेशचा लांब पल्ल्याचा धावपटू सावन बरवालने रविवारी इतिहास रचला. सावन याने ‘एनएन मॅरेथॉन रॉटरडॅम’ शर्यतीत २ तास ११ मिनिटे ५८ सेकंद अशी वेळ देताना तब्बल ४८ वर्षांपासून अबाधित असलेला शिवनाथ सिंह याचा मॅरेथॉनचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.

सावन या शर्यतीत एकूणात विसाव्या स्थानावर राहिला. मात्र, त्याने शिवनाथचा २ तास १२ सेकंदाचा ४८ वर्षे जुना विक्रम खोडून काढला. शिवनाथने १९७८ मध्ये ही कामगिरी केली होती. या शर्यतीत सहभागी झालेला दुसरा भारतीय धावपटू गोपी थोनाकल २३ व्या स्थानावर राहिला. त्याने ४२.१९५ किमी अंतर २:१३:१६ सेकंद वेळेत पूर्ण केले.

बरवालचे हे यश अधिक विशेष आहे कारण रॉटरडॅममधील ही त्याची पहिलीच अधिकृत मॅरेथॉन शर्यत होती. यापूर्वी त्याने कोणतीही अधिकृत मॅरेथॉन शर्यतीत सहभाग घेतला नव्हता. यावर्षी जानेवारीत अमेरिकेत झालेल्या जागतिक क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धेनंतर ही त्याची या हंगामातील दुसरी स्पर्धा होती. भारतीय लष्करातील जवान असलेल्या बरवालने २१ किमीच्या टप्प्यावर १:०४:४३ वेळ नोंदवून २७ वे स्थान मिळवले होते, तर गोपी १:०४:४४ वेळेसह ३३ व्या स्थानावर होता. बरवालने ३५ किमीच्या टप्प्यावर १९ व्या स्थानापर्यंत झेप घेतली होती, मात्र शेवटी तो २० व्या स्थानावर राहिला.

हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील जोगिंदर नगर येथील रहिवासी असलेल्या २८ वर्षीय बरवालने अनेक वर्षे कठोर परिश्रम करून स्वतःला एक निष्णात धावपटू म्हणून सिद्ध केले आहे. त्याने मिळवलेले यश हे त्याच परिश्रमांचे फळ आहे. हिमाचलच्या डोंगराळ भागातून येत त्याने रॉटरडॅमच्या सपाट रस्त्यांवर ऐतिहासिक कामगिरी केली.

चढता आलेख

बरवालने यापूर्वी २०२२ च्या फेडरेशन चषक स्पर्धेत १०००० मीटर शर्यतीत रौप्य पदक पटकावले होते. त्याच वर्षी त्याने गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ५००० मीटरमध्ये कांस्यपदक पटकावले. त्यानंतर २०२३ मध्ये दुबईतील आशियाई अर्धमॅरेथॉन शर्यतीत कांस्यपदक जिंकून त्याने पहिले आंतरराष्ट्रीय पदक मिळवले. पुढील वर्षी २०२४ च्या फेडरेशन चषक स्पर्धेत त्याने ५००० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकून पहिले राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. मात्र, २०२५ हे वर्ष त्याच्यासाठी सर्वात यशस्वी ठरले. त्याने उत्तराखंडमधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ५००० आणि १०००० मीटरमध्ये सुवर्ण, फेडरेशन चषक स्पर्धेमध्ये १०००० मीटरमध्ये सुवर्ण आणि भुवनेश्वरमधील जागतिक ॲथलेटिक्स संघटनेच्या खंडीय स्पर्धेत ५००० मीटरमध्ये कांस्यपदक मिळविले. बरवाल भारतात गोपाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.