Scotland vs Italy: इटलीचा संघ आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत आपला पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. त्यामुळे इटलीच्या खेळाडूंसाठी हा ऐतिहासिक क्षण होता. इटलीचा पहिला सामना स्कॉटलंड संघाविरूद्ध पार पडला. या सामन्यात इटलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या स्कॉटलंडने २० षटकांअखेर ४ गडी बाद २०७ धावांचा डोंगर उभारला. या सामन्यात २०० धावांचा पल्ला गाठताच स्कॉटलंड संघाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. स्कॉटलंडचा संघ हा असोसिएडेट राष्ट्र म्हणून टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत २०० धावांचा पल्ला गाठणारा पहिलाच संघ ठरला आहे.

या सामन्यात स्कॉटलंडकडून फलंदाजी करताना जॉर्ज मुंसीने सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर स्कॉटलंडने २०० धावांचा पल्ला गाठला. याआधी कुठल्याही असोसिएडेट राष्ट्राला टी-२० वर्ल्डकपमध्ये २०० धावांचा पल्ला गाठता आला नव्हता. याआधी अमेरिकेने कॅनडाविरूद्ध खेळताना १९७ धावा केल्या होत्या. आता २०७ धावांचा डोंगर उभारून अमेरिकेचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. गेल्या सामन्यात स्कॉटलंडच्या फलंदाजांना चांगली सुरूवात मिळाली होती. पण ते धावांचा यशस्वी पाठलाग करू शकले नव्हते. या सामन्यात स्कॉटलंडच्या फलंदाजांनी सुरूवातीपासूनच तुफान फटकेबाजी केली.

हा सामना स्कॉटलंडने ७३ धावांनी आपल्या नावावर केला आहे. यासह हा असोसिएडेट राष्ट्राचा टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील दुसरा सर्वात मोठा विजय आहे. याआधी २०१४ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत नेपाळने हाँगकाँगवर ८० धावांनी विजय मिळवला होता. या रेकॉर्ड अजूनही कोणत्या संघाला मोडता आलेला नाही. त्यानंतर २०१६ मध्ये अगाणिस्तानने झिम्बाब्वेविरूद्ध झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने ५९ धावांनी विजय मिळवला होता. तर नामिबीयाने श्रीलंकेविरूद्ध झालेल्या सामन्यात ५५ धावांनी विजय मिळवला होता. हा चौथा सर्वात मोठा विजय होता.

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात मोठी धावसंख्या उभारणारे असोसिएटेड राष्ट्र

स्कॉटलंड विरूद्ध इटली, कोलकाता, २०२६ ( ४ गडी बाद २०७ धावा)
अमेरिका विरूद्ध कॅनडा, डलास, २०२४ (३ गडी बाद १९७ धावा)
कॅनडा विरूद्ध अमेरिका, डलास, २०२४ (५ गडी बाद १९४ धावा)
नेदरलँड विरूद्ध आयर्लंड, सिलहट, २०१४ (४ गडी बाद १९३ धावा )
आयर्लंय विरूद्ध नेदरलँड, सिलहट, २०१४ (४ गडी बाद १८९ धावा)