आठ गडी राखून फडशा पाडण्यात यशस्वी

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी भारतीय संघाने वेगवान फटकेबाजी केली. रवींद्र जडेजाच्या (३/१५) प्रभावी फिरकीनंतर के. एल. राहुलने (१९ चेंडूंत ५० धावा) केलेल्या आतषबाजीच्या बळावर भारताने स्कॉटलंडचा तब्बल आठ गडी आणि ८१ चेंडू राखून फडशा पाडला.

स्कॉटलंडचा ८५ धावांत खुर्दा केल्यानंतर भारताने निव्वळ धावगतीच्या शर्यतीत अफगाणिस्तानला मागे टाकण्यासाठी निर्धारित लक्ष्य ७.१ षटकांत गाठणे गरजेचे होते. परंतु राहुल आणि रोहित शर्मा (१६ चेंडूंत ३० धावा) यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे भारताने ६.३ षटकांतच विजय मिळवला. ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या इतिहासात भारताने प्रथमच इतके चेंडू राखून विजय साकारला. आता रविवारी अफगाणिस्तानने न्यूझीलंडला नमवल्यास भारतापुढे उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी नवे समीकरण उभे राहील. तत्पूर्वी, कर्णधार विराट कोहलीने वाढदिवशी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना जडेजा आणि शमी यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवून स्कॉटलंडचा डाव १७.४ षटकांत ८५ धावांत गुंडाळला. जसप्रीत बुमराने दोन, तर रविचंद्रन अश्विनने एक बळी मिळवला.

संक्षिप्त धावफलक

स्कॉटलंड : १७.४ षटकांत सर्व बाद ८५ (जॉर्ज मुन्से २४; रवींद्र जडेजा ३/१५, मोहम्मद शमी ३/१५) पराभूत वि. भारत : ६.३ षटकांत २ बाद ८९ (के. एल. राहुल ५०,रोहित शर्मा ३०; मार्क वॅट १/२०)

सामनावीर : रवींद्र जडेजा