इतिहासात प्रथमच केनियाच्या सेबॅस्टियन सावेने दोन तासांच्या आत मॅरेथॉन पूर्ण करण्याचा दीर्घकाळ राहिलेला आणि कठीण मानला जाणारा टप्पा पार केला. रविवारी, २६ एप्रिलला लंडन मॅरेथॉन जिंकत त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली.

गतविजेता असलेल्या सावेला शेवटच्या टप्प्यात इथिओपियाच्या योमिफ केजेलचा याने कडवी झुंज दिली. मात्र शेवटी त्याने वेगात जबरदस्त वाढ करत १ तास ५९ मिनिटे ३० सेकंदांत शर्यत पूर्ण केली. या कामगिरीसह त्याने २०२३ च्या शिकागो मॅरेथॉनमध्ये केल्विन किप्टुमने केलेला २:००:३५ हा जागतिक विक्रमही मोडीत काढला.

सावेव्यतिरिक्त इथिओपियाच्या योमिफ केजेलचानेही दोन तासांची मर्यादा भेदत १:५९:४१ अशी वेळ नोंदवली, तर युगांडाच्या जेकब किप्लिमोने २:००:२८ वेळेसह तिसरे स्थान मिळवलं. विशेष म्हणजे, या तिघांनीही २०२३ मध्ये शिकागो मॅरेथॉनमध्ये दिवंगत केल्विन किप्टुमने केलेल्या २:००:३५ या आधीच्या जागतिक विक्रमापेक्षा जलद शर्यत पूर्ण केली.

ही शर्यत अधिकृत मॅरेथॉन धावण्याच्या इतिहासात मोठा टर्निंग पॉइंट ठरली. दोन तासांच्या आत मॅरेथॉन पूर्ण करणं ही मानवी क्षमतेच्या पलीकडील गोष्ट मानली जात होती, पण या कामगिरीने ती समजूत पूर्णपणे बदलून टाकली आणि नवा विश्वविक्रम पाहायला मिळाला.

केनियाच्या एलियुड किपचोगेने ऑक्टोबर २०१९ मध्ये १:५९:४० वेळ नोंदवत दोन तासांच्या आत मॅरेथॉन पूर्ण करणारा पहिला खेळाडू म्हणून इतिहास घडवला होता. मात्र ही कामगिरी अधिकृत जागतिक विक्रम म्हणून मान्य करण्यात आली नाही, कारण त्याने विशेष शूज वापरले होते, पेसिंग आणि फ्लुईंड इनटेकसंबंधित स्पर्धेच्या नियमांचे पालन झाले नव्हते आणि ती खुली स्पर्धा नव्हती.

रविवारी झालेल्या स्पर्धेपूर्वीच सेबेस्टियन सावेने सूचित केलं होतं की कोर्स रेकॉर्ड किंवा अगदी जागतिक विक्रमही तोडता येऊ शकतो. त्याने अॅडिडासच्या नवीन ‘Pro Evo 3’ सुपरशूजचा वापर केला होता, ज्याचे वजन १०० ग्रॅमपेक्षा कमी आहे. सावेने सुरुवातीपासूनच वेगवान लय ठेवत सहा धावपटूंच्या गटासह हाफवे मार्क १:००:२९ मध्ये पार केला. त्यानंतरही वेग कायम कमालीचा राहिला आणि शर्यतीत पुढे जात असताना आघाडीच्या गटातील धावपटू हळूहळू कमी होत गेले.

शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यात सेबॅस्टियन सावे आणि योमिफ केजेलचा यांनी इतर धावपटूंना मागे टाकत आघाडी घेतली. अंतिम क्षणांपर्यंत दोघांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळाली. मात्र फिनिश लाईन जवळ येताच सावेनं वेगात निर्णायक वाढ केली आणि असा फरक निर्माण केला की केजेलचा तो भरून काढू शकला नाही.