‘वेग’मानव!

यश हे सहजासहजी मिळत नाही आणि मिळाले तरी ते चिरंतन कधीच टिकत नाही. यशाचा मार्ग हा खडतर असतो. तो पार करण्यासाठी बऱ्याच अग्निदिव्यांतून जावे लागते. कठोर मेहनत, त्याग, जिद्द, चिकाटी आणि संयम या पंचसूत्रीच्या सेबॅस्टियन वेटेलने मिळवलेले यश हे वादातीत आहे. पण हे यश चिरंतन टिकवण्याचे आव्हान त्याला पेलावे लागणार आहे.

यश हे सहजासहजी मिळत नाही आणि मिळाले तरी ते चिरंतन कधीच टिकत नाही. यशाचा मार्ग हा खडतर असतो. तो पार करण्यासाठी बऱ्याच अग्निदिव्यांतून जावे लागते. कठोर मेहनत, त्याग, जिद्द, चिकाटी आणि संयम या पंचसूत्रीच्या सेबॅस्टियन वेटेलने मिळवलेले यश हे वादातीत आहे. पण हे यश चिरंतन टिकवण्याचे आव्हान त्याला पेलावे लागणार आहे.
सेबॅस्टियनचे लक्ष शाळेत आणि शिक्षणात कधीच रमले नाही. मायकेल जॉर्डन, मायकेल जॅक्सन आणि मायकेल शूमाकर या तीन दिग्गज व्यक्तींचा पगडा त्याच्यावर होता. म्हणूनच तो गायकीकडे वळला. अखेर आपला आवाज चांगला नसल्याचे त्याच्या वेळीच लक्षात आले. आपले सर्व मित्र फुटबॉल खेळण्यात दंग असताना त्याने मात्र वेगळ्या धाटणीची कारकीर्द घडवण्याचा निर्धार केला. मोठी बहीण स्टेफनी हिच्या पावलावर पाऊल ठेवत त्याने रेसिंग ड्रायव्हर म्हणून नशीब अजमावण्याचे ठरवले. वयाच्या पाचव्या वर्षी नाताळाची भेट म्हणून वडिलांकडून एक छोटीसी कार मिळाल्यानंतर त्याच्या कारकिर्दीला खरी कलाटणी मिळाली. याच वर्षी त्याने शर्यतीसाठी पहिल्यांदा ट्रॅकवर पाऊल टाकले.
वयाच्या १४व्या वर्षी जर्मन ज्युनियर कार्टिग शर्यत, मोनॅको कार्ट चषक आणि युरोपियन ज्युनियर कार्टिग शर्यतीचे अजिंक्यपद पटकावल्यानंतर तो फॉम्र्युला बीएमडब्ल्यू अजिंक्यपद शर्यतीकडे वळला. पहिल्याच मोसमात त्याने दुसरा येण्याचा मान मिळवला. वयाच्या १७व्या वर्षी २०पैकी १८ शर्यतींमध्ये विजय, ही वेटेलच्या वर्चस्वशाहीची झलक होती.
बीएमडब्ल्यूशी असलेल्या नातेसंबंधांमुळे वेटेलला २००६मध्ये बीएमडब्ल्यू सौबेर संघाचा राखीव ड्रायव्हर म्हणून स्थान मिळाले. पण वेगावर स्वार होण्याची ही शर्यत किती जीवघेणी आहे, याची प्रचीती त्याला बेल्जियम ग्रां. प्रि. शर्यतीदरम्यान आली. त्यावेळी फॉम्र्युला-वन हा ‘बच्चे’कंपनीचा खेळ नाही, अशी टीका युवा वेटेलवर झाली. हाताला जबर मार आणि उजव्या हाताच्या बोटाला टाके पडल्यानंतर वेटेलची कारकीर्द बहरण्याआधीच संपुष्टात आली होती. पण सौबेरने त्याला पुन्हा राखीव ड्रायव्हर म्हणून संघात स्थान दिले. त्यानंतर अनेक शर्यतींमध्ये वेटेलला समाप्तरेषा ओलांडता आली नाही. कधी अपघातामुळे तर कधी इंजिनमधील बिघाडामुळे त्याच्या कारकिर्दीला दिशा सापडत नव्हती. अखेर २००७मध्ये इंडियानापोलिस येथील शर्यतीत आठवा क्रमांक मिळवून फॉम्र्युला-वनमध्ये गुण मिळवणारा तो सर्वात युवा ड्रायव्हर ठरला. २००८मध्ये टोरो रोस्सोचे प्रतिनिधित्व करताना ३५ गुणांसह आठवा क्रमांक पटकावल्यामुळे वेटेलला रेड बुल संघाचे दरवाजे खुले झाले.
रेड बुल संघाशी करारबद्ध झाल्यानंतर वेटेल आणि रेड बुलचे नशीब फळफळले. २०१०मध्ये तो फॉम्र्युला-वनचा सर्वात युवा विश्वविजेता ड्रायव्हर ठरला. त्यानंतर आतापर्यंत वेटेलचाच बोलबाला सुरू आहे. सलग चार मोसम आणि सलग चार विश्वविजेतेपदांची कमाई वेटेलच्या नावावर आहे. ट्रॅकवर वेगवान असलेला वेटेल प्रत्यक्ष आयुष्यातही बिनधास्त आहे.
पत्रकारांच्या प्रश्नांना खोचकपणे उत्तरे देऊन वातावरण हसते-खेळते ठेवण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न असतो. चौथे विश्वविजेतेपद मिळवल्यानंतरचे त्याचे वागणे असभ्यपणाचे होते. गाडीतून खाली उतरल्यावर त्याने कारला केलेला नमस्कार असो वा थेट पत्रकार परिषदेत श्ॉम्पेनची बाटली घेऊन केलेले मद्यप्राशन असो.. बेदरकारपणे वागणाऱ्या वेटेलला महान ड्रायव्हर्सच्या पंक्तीत स्थान टिकवण्यासाठी यापुढे मात्र आपल्या वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sebastian vettel

ताज्या बातम्या