अस्कारीच्या विक्रमाशी वेटेलची बरोबरी

रेड बुलचा ड्रायव्हर सेबॅस्टियन वेटेल याने सुरेख कामगिरीचे प्रदर्शन करत ब्राझिलियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीचे जेतेपद पटकावत सलग नऊ शर्यती

रेड बुलचा ड्रायव्हर सेबॅस्टियन वेटेल याने सुरेख कामगिरीचे प्रदर्शन करत ब्राझिलियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीचे जेतेपद पटकावत सलग नऊ शर्यती जिंकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. यासह वेटेलने इटलीच्या अल्बटरे अस्कारी यांनी फेरारीचे प्रतिनिधित्व करताना १९५२ आणि १९५३मध्ये रचलेल्या विक्रमाशी बरोबरी साधली. याचबरोबर वेटेलने एका मोसमात १३ शर्यती जिंकण्याच्या मायकेल शूमाकरच्या विक्रमाशीही बरोबरी साधली.
मोसमातील अखेरच्या शर्यतीत वेटेलसह त्याचा साथीदार मार्क वेबर याने दुसरा क्रमांक पटकावला. फॉम्र्युला-वनमधून निवृत्त होणाऱ्या वेबरने आपल्या कारकिर्दीची गोड सांगता केली. फेरारीच्या फर्नाडो अलोन्सो याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
‘‘लागोपाठ शर्यती जिंकत असताना मोसमाचा शेवट झाल्याने मी निराश झालो आहे. रविवारी पावसाची अपेक्षा होती. पण पाऊस नसतानाही आम्ही चांगली कामगिरी केली. अखेरच्या शर्यतीत चांगली कामगिरी करता आल्याने मी आनंदी आहे. आता काही वेळ विश्रांती घेऊन पुढील वर्षांवर लक्ष केंद्रित करण्याचे मी ठरवले आहे,’’ असे जेतेपदानंतर वेटेलने सांगितले.
ब्राझिलियन शर्यतीत मॅकलॅरेनच्या जेन्सन बटनला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मर्सिडिझच्या निको रोसबर्गने पाचवे स्थान प्राप्त केले. मॅकलॅरेनचा सर्जीओ पेरेझ सहावा तर फेरारीचा फेलिपे मासा सातवा आला. सौबेरच्या निको हल्केनबर्ग याने आठव्या क्रमांकावर झेप घेतली. मर्सिडिझच्या लुइस हॅमिल्टनने नववे स्थान पटकावले. टोरो रोस्सोचा डॅनियल रिकार्डियो दहावा आला. फोर्स इंडियाच्या ड्रायव्हर्सना अव्वल दहा जणांमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले. पॉल डी रेस्टाने ११वा तर एड्रियन सुटीलने १३वा क्रमांक पटकावला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sebastian vettel ends season with brazilian grand prix win