चार वेळा विश्वविजेता ठरलेल्या सेबॅस्टियन वेटेलने रेड बुल संघाला सोडचिठ्ठी देत तीन वर्षांसाठी फेरारीशी करार केला आहे. कामगिरीत घसरण होत असलेल्या फेरारीला वेटेलने विश्वविजेतेपदाचे स्वप्न दाखवले आहे. पुढील मोसमापासून वेटेल हा किमी रायकोनेनच्या साथीने फेरारीचे प्रतिनिधित्व करणार आहे.
पाच वर्षांच्या कालावधीनंतर फर्नाडो अलोन्सो फेरारी संघातून बाहेर पडल्यानंतर वेटेलच्या नावाची घोषणा करण्यात आली. यापूर्वी २००७मध्ये फेरारीच्या रायकोनेनने अखेरचे जगज्जेतेपद पटकावले होते. त्यानंतर रेड बुलने वापरलेल्या रेनॉ इंजिनशी बरोबरी करणे फेरारीला जमले नाही. वेटेलच्या धडाकेबाज कामगिरीमुळे २००९ ते २०१३ या कालावधीत रेड बुलने कंस्ट्रक्टर्स चॅम्पियनशिपवर तर वेटेलने जगज्जेतेपदावर नाव कोरले.
फेरारीचे सहमालक मार्को माटिआकी यांनी वेटेलचे संघात स्वागत केले आहे. ते म्हणाले, ‘‘सर्वाधिक जेतेपदे पटकावणारा फॉम्र्युला-वनच्या इतिहासातील सर्वात युवा ड्रायव्हर सेबॅस्टियन वेटेलला करारबद्ध करताना आनंद होत आहे. त्याचा संघातील समावेश आणि अनुभव फेरारीला यशोशिखरावर नेण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे.’’