भारतीय क्रिकेट संघाची स्पर्धांमधील विजेतेपदे आतापर्यंत एखाद्या नायकाभोवती वलय निर्माण करत राहिली. पण, अलीकडच्या टी-२० विश्वकरंडक जेतेपदाकडे पाहिले, की लक्षात येते, की यात कोणत्याही सामन्याच्या वा सामन्याआधीच्या वेळी एकाच नायकाभोवती चर्चा होत राहिलेली नाही. – सिद्धार्थ केळकर
भारतीय क्रिकेट संघाची स्पर्धांमधील विजेतेपदे आतापर्यंत एखाद्या नायकाभोवती वलय निर्माण करत राहिली. कपिलदेव, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा अशी यादीच करता येईल. भारतीय मानसिकतेला ते साजेसेच. राजकारण, समाजकारण ते क्रीडाकारणापर्यंत यश साजरे करायला आपल्याला एखादा नेता, नायक लागतोच. अशा नायकांवर प्रेम केले जाते, त्यांची भक्ती होते आणि ते अपयशी ठरले, तर तितकीच जहरी टीकाही केली जाते.
सांघिक खेळामध्ये खरे तर अशी वैयक्तिक कामगिरी वेगळी काढावी का, हा प्रश्नच. कधीकधी एखाद्याच्या खेळीने सामन्याला कलाटणी मिळू शकते, हे खरे, पण तरीही त्याला त्याच्या दुसऱ्या सहकाऱ्यांची पूरक मदत लागतेच. उदाहरणार्थ, क्रिकेटमध्ये आघाडीची फळी गडगडल्यानंतर एखाद्या फलंदाजाने डाव सावरला, तर त्याला दुसऱ्या बाजूला बाद न होता उभा राहणारा तळातील एखादा खमका साथीदार लागतोच. गोलंदाजाबाबतही तेच. बळी घेणाऱ्या गोलंदाजाच्या जोडीने दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करणारा वा करणारे फलंदाजांवर अपेक्षित दबाव ठेवू शकले, तरच सामना जिंकता येतो. तसे झाले नाही, तर नुसते एखाद्याने जास्त बळी टिपून वा धावा काढून उपयोग नाही. म्हणूनच सामनावीर वा मालिकावीराचे पारितोषिक दिले जाते, ते वैयक्तिक खेळाचे कौतुक म्हणून अधिक. हे पारितोषिक दिलेल्याचा संघ जिंकलेलाच असतो, असे नाही.
क्रिकेटचा नजीकचा इतिहास पाहायचा, तर सचिन तेंडुलकरच्या खात्यावरील सामनावीराचे काही किताब भारत जिंकलेला नसतानाही मिळाल्याचे दिसेल (आठवा : शारजातील एप्रिल १९९८ मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना, सामन्यादरम्यान आलेले धुळीचे वादळ आणि नंतर भारताला अंतिम फेरीची पात्रता मिळवून देणारी तेंडुलकरची तडाखेबंद खेळी, जी त्याला सामनावीराचा किताब देऊन गेली खरी, पण तो सामना भारताने गमावला होता). म्हणूनच, ‘तेंडुलकर फलंदाजी करत होता, तोवर सामना भारताच्या हातात होता, तो बाद झाला आणि सामना निसटला,’ असे हताश उद्गार नव्वदच्या दशकात मनोभावे क्रिकेट पाहिलेल्या अनेकांनी उच्चारल्याचे स्मरेल.
भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वकरंडक नुकताच जिंकला, त्या पार्श्वभूमीवर ही सगळी उजळणी. अशासाठी, की या जेतेपदाचा कुणी एकच नायक नाही, तर संघातील प्रत्येकाने वेळोवेळी केलेली कामगिरी, दिलेले योगदान याच्या जोरावर हे जेतेपद मिळाले आहे. हे करताना जी व्यावसायिक सफाई दिसते, तीही महत्त्वाची. क्रिकेट पाहताना भारतीय भावनिक असतोच. पण, खेळताना तो अधिक व्यावसायिक असेल, तर निकालही अधिक चांगले मिळतात. ऑस्ट्रेलियाच्या संघाने हे अनेकदा करून दाखवले आहे, भारतानेही आता ते करून दाखवायला सुरुवात केली, हे या जेतेपदाचे वेगळेपण.
नायकत्व बहाल करणे, या मुद्द्याला अनुषंगून क्रिकेट विश्व करंडक स्पर्धांतील विजयांचा अन्वयार्थ लावण्यासाठी वरील पार्श्वभूमी. अगदी सुरुवातीपासून पाहू. १९८३ मध्ये भारताला विश्वविजेतेपद मिळाले, तेव्हा काही भारतीय संघ मजबूत नव्हता. म्हणजे, संघात जगभरात नावाजलेले क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचा अपवाद वगळता कुणी तसे नायक नव्हते. कपिलदेव यांचे प्रेरणादायी नेतृत्व आणि संघातील प्रत्येक खेळाडूचा त्याच्या कुवतीनुसार करून घेतलेला पुरेपूर वापर हे त्या विजेतेपदाचे थोडक्यात सार. महेंद्रसिंह धोनीने हेच २००७ च्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेवेळी साधले (आठवा : अंतिम सामन्यातील जोगिंदर शर्माला दिले गेलेले शेवटचे षटक!). नंतर २०११ मध्ये धोनीच्या नेतृत्वाबरोबरच, ‘सचिनसाठी कप जिंकायचाय,’ ही भावना प्रबळ होती. २०२४ मध्ये विश्वकरंडक जिंकतानाही रोहित, विराटची शेवटची टी-२० स्पर्धा हे कथन होतेच. सांगायचा मुद्दा इतकाच, की या सर्व स्पर्धांमधील यश पूर्णपणे सांघिक असले, तरी कळत-नकळत त्यातील नायक किंवा नायकत्व अधिक उजळले.
या पार्श्वभूमीवर, अलीकडच्या टी-२० विश्वकरंडक जेतेपदाकडे पाहिले, की लक्षात येते, की यात कोणत्याही सामन्याच्या वा सामन्याआधीच्या वेळी एकाच नायकाभोवती चर्चा होत राहिलेली नाही. सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाची वा डावपेचांची समीक्षा प्रशिक्षक गौतम गंभीरच्या आणि इतर सहायक मार्गदर्शकांच्या जोडीनेच झाली, तर इतर खेळाडूंचे मूल्यमापनही त्या-त्या सामन्याच्या अनुषंगाने झाले. म्हणूनच, अभिषेक शर्माचा हरपलेला सूर ते शेवटच्या सामन्यातील अर्धशतक, संजू सॅमसनचे बाद फेरीत संघात पदार्पण आणि सलग तीन महत्त्वाच्या सामन्यांत झंझावाती अर्धशतके, इशान किशनचे जोरदार पुनरागमन, आधी वगळलेल्या अक्षर पटेलने उपान्त्य सामन्यात घेतलेले दोन अफलातून झेल, तिलक वर्मा, शिवम दुबेने मोक्याच्या क्षणी खेळलेल्या खेळ्या, जसप्रीत बुमराहने संघाच्या गोलंदाजीला आणलेली धार, वरुण चक्रवर्तीचे स्पर्धेत सर्वाधिक बळी, रिंकू सिंहची क्षेत्ररक्षणातील चपळता, अर्शदीपसिंगची स्विंग गोलंदाजी आणि हार्दिक पांड्याचे अष्टपैलूत्व असे सगळेच या जेतेपदात मोलाचे.
या संघाची खासियत अशी, की यातील बरेचसे खेळाडू दोनच वर्षांपूर्वीच्या विश्वकरंडक मिळविलेल्या संघात खेळलेले किंवा संघात स्थान असलेले. काही त्या वेळी संघात नसले, तरी रोहित, विराट खेळत असताना त्यांच्याबरोबर खेळलेले. आणि, सगळेच सध्याच्या प्रशिक्षक गौतम गंभीरच्या तालमीत तयार झालेले, जो २०११ च्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील नायक फलंदाज. त्यात आता सूर्यकुमार यादवने रोहित शर्माच्या हाताखाली खेळल्याचे केलेले अनुभवकथन, संजू सॅमसनने सचिन तेंडुलकरशी बोलल्याचा कसा फायदा झाला, याबाबत अंतिम सामन्यानंतर सांगितलेली कहाणी आणि २०११ च्या स्पर्धेतील मालिकावीर युवराजसिंगचे अभिषेक शर्माला वेळोवेळी मिळणारे छोट्या-मोठ्या टिप्सच्या स्वरूपातील मार्गदर्शन अशा काही गोष्टी मिळवा. म्हणजे, हा संपूर्ण संघ कोणत्या प्रेरणेने खेळला असेल, ते लक्षात येईल. अर्थात, उपरोल्लेखित सर्व गोष्टी पूरक. मुळात या संघातील खेळाडूंना आपापल्या क्षमता आणि मर्यादा दोन्ही माहीत होत्या. त्यात या पूरक गोष्टींची भर पडली आणि परिपूर्ण सांघिक यश मिळाले, हेही अधोरेखित करायला हवे.
भारतीय क्रिकेट संघ एकल नायकाकडून अधिकाधिक सांघिक कामगिरीकडे सरकू लागला, तो २००० च्या दशकापासून. सौरभ गांगुलीचे नेतृत्व आणि त्याला प्रामुख्याने सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अनिल कुंबळेची मिळालेली साथ येथपासून हा कालखंड सुरू होतो. या ‘फॅब फाइव्ह’च्या तालमीतच वीरेंद्र सेहवाग, झहीर खान, हरभजनसिंग, युवराजसिंग हे प्रतिभावान, शैलीदार, पण आक्रमक खेळाडू वैयक्तिक पराक्रमांवर भर न देता सांघिक कामगिरीला हातभार देत राहिले. असे असले, तरी तेंडुलकर, गांगुली, द्रविड, लक्ष्मण, कुंबळे यांना स्वतंत्र नायकत्व मिळतच होते.
गांगुलीनंतर यातील तीनजण संघाचे कर्णधार झाले, हे त्याचेच प्रतीक. असे नायकत्व बाजूला सारून तुलनेने नवख्याकडे नेतृत्व देण्याचा प्रयत्न झाला, तो महेंद्रसिंह धोनीला कर्णधारपद देताना. त्याने टी-२० च्या लोकप्रियतेची आणि त्यामुळे होऊ लागलेल्या ५० षटकांच्या सामन्यांतील बदलांची चाहूल फार लवकर ओळखली. फक्त गुणवत्ता नाही, तर संघासाठीची उपयुक्तता हा येथून पुढे मोठा गुण ठरेल, हे ओळखून धोनीने संघात बदल केले. त्यात सुरेश रैना, रवींद्र जडेजादी खेळाडूंना स्थान देताना प्रसंगी लक्ष्मणसारख्याला चपळ क्षेत्ररक्षण नाही म्हणून वगळण्याची शिफारस करण्यापर्यंतचे धोरणही आणले. धोनीने खेळाडूंच्या नायकत्वापेक्षा सांघिक उपयुक्ततेला महत्त्व देऊन कळीचा बदल घडवला, पण या प्रक्रियेत तोही नकळत नायक झाला. ‘आयपीएल’मधील चेन्नई सुपरकिंग्जचे कर्णधारपद हा त्यातील मैलाचा दगड. ‘धोनीचे नेतृत्व म्हणजे यशाची खात्री,’ असे समीकरण दृढ करून धोनीचे व्यक्तिगत महत्त्व बाह्य गोष्टींनीच वाढवत नेले.
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचे वैयक्तिक चाहते असतात आणि ते असणारच. ते आपल्या क्रिकेटप्रेमाच्या ‘डीएनए’मध्येच आहे. पण, ते संघासाठी अवजड होऊ लागले, की सांघिक कामगिरी घसरते. निवड समितीने, प्रशिक्षक-कर्णधाराने अमुक एका खेळाडूला वगळलेच कसे, या चर्चा त्यातूनच जन्म घेतात. त्या सध्या जिंकलेल्या संघाच्या बाबतीत – अक्षर पटेलला पहिल्या काही सामन्यांत न खेळविण्याच्या निर्णयाबाबत किंवा अभिषेक शर्माला का वगळले जात नाही, याबाबत – झाल्याच आहेत. त्यात या वेळी जाणवलेले वेगळेपण असे, की अशा बाह्य चर्चांना किंमत न देता खेळाडूंच्या क्षमतेनुसार आणि ठरविलेल्या धोरणानुसार प्रशिक्षक-कर्णधार आपल्या रणनीतिवर ठाम राहिले. अभिषेक शर्माने अंतिम सामन्यात आणि संजू सॅमसनने संधी मिळताच ते सिद्धही करून दाखवले. या एकत्रित प्रयत्न आणि धोरणांचा परिणाम असा, की संघाच्या स्पर्धा विजयानंतर कुणा एकाला नायकत्व बहाल केले गेलेले नाही. ‘माझ्यासाठी वैयक्तिक कामगिरी नाही, तर सांघिक यश महत्त्वाचे. चषक जिंकणे मोठे,’ असे प्रशिक्षक गौतम गंभीरचे अंतिम सामन्यानंतरचे वक्तव्य हेच सांगणारे.
‘संघातील सगळे खेळाडू काही एकमेकांचे मित्र नसतात, तशी गरजही नाही. पण, कुणावर काय जबाबदारी आहे, हे प्रत्येकाला पक्के माहीत असते. त्यांचे काम ती जबाबदारी पार पाडण्याचे असते,’ असे एका ऑस्ट्रेलियन खेळाडूने मध्यंतरी ऑस्ट्रेलियाची क्रिकेट यशाची टक्केवारी जास्त का असते, त्याबद्दल बोलताना सांगितले. भारतीय संघातही असा व्यावसायिक दृष्टिकोन येत असेल, तर उत्तमच. त्याच पार्श्वभूमीवर, जाता जाता भारतीय संघाचा सध्याचा प्रशिक्षक गौतम गंभीरबाबतचा हा किस्सा.
गौतम गंभीरने २०११ च्या विश्वचषक अंतिम सामन्यात ९७ धावांची खेळी करून आणि धोनीबरोबर मोठी भागीदारी रचून भारताला विजयाच्या समीप नेले होते. चषक जिंकल्यानंतर संघाने दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत दणक्यात पार्टी केली होती. पण, गंभीर जाऊन शांतपणे झोपला. ‘मी जवळपास ९० षटके मैदानावर असल्याने दमलो होतो, म्हणून जाऊन झोपलो. त्यावरून अजूनही माझे त्या वेळचे काही सहकारी मला चिडवतात,’ अशी आठवण त्याने अलीकडेच सांगितली. मुद्दा असा, की पार्टीला न जाता झोपायला जाण्यापूर्वी गंभीरने त्याच्यावर संघाप्रती असलेली जबाबदारी चोख पार पाडली होती… भारतीय क्रिकेट संघाची धुरा सध्या अशा ‘गंभीर’ विचार करणाऱ्याकडे आहे.
siddharth.kelkar@expressindia.com
