Sediqullah Atal world record Afghanistan vs Ireland: अफगाणिस्तानने १२ ऑगस्टला झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडवर दमदार विजय मिळवला. या विजयासह अफगाणिस्तानने अजून एक सामना बाकी असताना मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. अफगाणिस्तानने हा सामना ४२ धावांनी जिंकला आणि या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला संघाचा स्टार सलामीवीर सिदीकुल्लाह अटल. यासह मोठा विक्रम त्याने आपल्या नावे केला आहे.

सेदिकुल्लाह अटलने या सामन्यात तुफानी फलंदाजी करत १२० चेंडूत १४३ धावांची विक्रमी खेळी साकारली. त्याच्या या खेळीत १७ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, ही ऐतिहासिक खेळी त्याने त्याच्या २५ व्या वाढदिवशी खेळली.

सेदिकुल्लाह अटलने या शतकासह एक मोठा जागतिक विक्रम मोडला. वाढदिवशी वनडेमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर झाला आहे. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडचा टॉम लॅथम याच्या नावावर होता. लॅथमने २०२२ मध्ये आपल्या ३० व्या वाढदिवशी नेदरलँड्सविरुद्ध १४० धावांची खेळी केली होती. वाढदिवशी वनडेमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता सिदीकुल्लाह अतल अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

वाढदिवशी वनडेमध्ये सर्वात मोठी खेळी साकारणारे फलंदाज

सेदिकुल्लाह अटल – अफगाणिस्तान वि. आयर्लंड – १४३ धावा – २५वा वाढदिवस
टॉम लॅथम – न्यूझीलंड वि. नेदरलँड्स – १४०* धावा – ३०वा वाढदिवस
सचिन तेंडुलकर – भारत वि. ऑस्ट्रेलिया – १३४ धावा – २५ वा वाढदिवस
रॉस टेलर – न्यूझीलंड वि. पाकिस्तान – १३१ धावा – २७वा वाढदिवस
सनथ जयसूर्या – श्रीलंका वि. बांगलादेश – १३० धावा – ३९वा वाढदिवस

सेदिकुल्लाह अटल-इब्राहिम झादरानच्या शतकांमुळे अफगाणिस्तानचा विजय

आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला उतरलेल्या अफगाणिस्तानने ५० षटकांत ९ बाद ३४३ धावांचा डोंगर उभारला, जी अफगाण संघाच्या वनडे इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. सेदीकुल्लाह अटल आणि इब्राहिम झादरान यांच्या अफलातून २३१ धावांच्या भागीदारीने या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. अटलने आक्रमक भूमिका घेत अवघ्या १२० चेंडूत १४३ धावांची स्फोटक खेळी केली. त्याच्या फलंदाजीसमोर आयर्लंडचे गोलंदाज पूर्णपणे हतबल झाले.

सलामीवीर इब्राहिम झादराननेही शानदार साथ देत ११८ चेंडूत १०७ धावा केल्या आणि आपलं शतक पूर्ण केलं. या दोघांच्या शतकांमुळे अफगाणिस्तानने आयर्लंडसमोर डोंगराएवढं मोठं लक्ष्य उभं केलं. आयर्लंडकडून बायरन मॅकडोनो हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३ विकेट्स घेतल्या, मात्र त्यासाठी त्याला ८४ धावा खर्च कराव्या लागल्या.