ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात सूर्यकुमार यादवला स्थान न मिळाल्यामुळे सोशल मीडियावर सुरु झालेला वाद अजुनही सुरुच आहे. आयपीएल आणि रणजी क्रिकेटमध्ये बहारदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमारकडे निवड समिती गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दुर्लक्ष करत आहे. अनेक माजी खेळाडूंनी सूर्यकुमारला भारतीय संघात स्थान मिळायला हवं होतं असं मत व्यक्त केलं. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारानेही सूर्यकुमारच्या पारड्यात आपलं मत टाकलं आहे.

अवश्य वाचा – …थांबण्यासाठी इथपर्यंत आलेलो नाही, सूर्यकुमार यादवचं सूचक ट्विट

“एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या संघात सलामीवीरांव्यतिरीक्त तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा फलंदाजही तितकाच महत्वाचा असतो. संघातील सर्वात महत्वाचा खेळाडू ज्याच्यावर तुम्ही भरवसा ठेवू शकता अशा खेळाडूंना तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली जाते. माझ्या दृष्टीकोनातून गेले काही हंगाम सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सकडून हे काम चोख बजावतो आहे. पण असं असूनही त्याला भारतीय संघात स्थान का मिळालं नाही हेच कळत नाही.” लारा Star Sports वाहिनीच्या क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमात बोलत होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली आणि त्यात सूर्यकुमारचं नाव नव्हतं तेव्हा मीच निराश झालो होतो. तो चांगली फलंदाजी करत होता, धावाही काढत होता त्यामुळे त्याची संघात निवड होईल अशी मला आशा होती. आयपीएलचं नाही तर स्थानिक क्रिकेटमध्येही त्याची कामगिरी चांगली होतेय, लाराने आपलं मत मांडलं.