Wrestler Protest : भारतीय कुस्तीपटूंविरोधात रविवारी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली. जंतरमंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्या आणि नव्या संसद भवनाच्या दिशेने जाणाऱ्या या कुस्तीपटूंची धरपकड करण्यात आली. तसंच, ताब्यात घेतल्यानंतर या कुस्तीपटूंविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. रविवारचा दिवस या घटनेमुळे गाजला. दरम्यान, महिला कुस्तीपटूंच्या या आंदोलनाला बळ देणाऱ्या बजरंग पुनिया याने एका आयपीएस अधिकाऱ्यालाही खडेबोल सुनावले आहेत. भाजपा खासदार आणि भारतीय कुस्तीपटू महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी काही महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला जातोय. याप्रकरणी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी कुस्तीपटूंनी गेल्या महिन्याभरापासून जंतरमंतरवर आंदोलन पुकारले आहे. परंतु, त्यांच्या आंदोलनाकडे कानाडोळा करणाऱ्या सरकारविरोधात नव्या संसद भवनात महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. या महापंचायतीसाठी जंतर मंतरहून नव्या संसद भवनाकडे जाणाऱ्या कुस्तीपटूंविरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आणि काही कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेताच त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींदरम्यान निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याने या आंदोलनाविरोधात ट्वीट केलं आहे. "गरज पडली तर गोळ्याही घालू. पण तुमच्या सांगण्यावरून नाही. आता तर कचऱ्याच्या पिशवीप्रमाणे तुम्हाला फरफटत नेऊन फेकून दिलं आहे. कलम १२९ अंतर्गत पोलिसांना गोळ्या घालण्याचा अधिकार आहे. उचित परिस्थितीत पोलीस तेही करतील. पण ते समजण्यासाठी शिक्षित असणं गरजेचं आहे. मग, भेटूया पोस्टमार्टम टेबलवर," असं ट्वीट डॉ.एन. सी. अस्थना या आयपीएस अधिकाऱ्याने केलं आहे. हेही वाचा >> “देशात हुकूमशाही सुरू झालीये का?” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल! हे संतापजनक ट्वीट पाहून भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया यानेही रिट्वीट केलं आहे. "हे आयपीएस अधिकारी आम्हाला गोळ्या मारण्याचं बोलत आहेत. भाई समोर उभा आहे, सांगा कुठे यायचंय गोळी खायला? शपथ आहे, पाठ नाही दाखवणार, छातीवर तुझी गोळी झेलू. हेच आता आमच्यासोबत करणं बाकी राहिलं असेल तर हेही चालेल", असं चोख प्रत्युत्तर बजरंग पुनिया याने दिलं. साक्षी मलिकनं केला संतप्त सवाल! दरम्यान, रात्री गुन्हा दाखल होताच आंदोलक कुस्तीपटू साक्षी मलिकनं संतप्त सवाल करणारं ट्वीट केलं आहे. “दिल्ली पोलिसांना लैंगिक शोषण करणाऱ्या बृजभूषण सिंह यांच्याविरोधात FIR दाखल करण्यासाठी सात दिवस लागतात. पण शांततेत आंदोलन करण्यासाठी आमच्याविरोधात FIR दाखल करण्यासाठी सात तासही लागले नाहीत. या देशात हुकुमशाही सुरू झाली आहे का? इथलं सरकार कशा प्रकारे आपल्या खेळाडूंशी वागतंय, हे अवघं जग बघतंय”, असं साक्षीनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. कुस्तीगीरांवर गुन्हा दाखल आंदोलक कुस्तीपटूंवर दिल्ली पोलिसांनी रविवारी जंतरमंतरवर घडलेल्या गोंधळप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता कलं १४७, १४९, १८६, १८८, ३३२, ३५३ आणि पीडीपीपी कायद्याच्या कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या हवाल्याने एएनआयनं दिली आहे.