निवड समितीच्या बैठकीत कोहलीच्या कर्णधारपदाविषयीही चर्चा रंगणार

न्यूझीलंडविरुद्ध आगामी ट्वेन्टी-२० मालिकेसाठी रोहित शर्माची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) पदाधिकारी आणि राष्ट्रीय निवड समितीची पुढील काही दिवसांत बैठक होणार असून विराट कोहलीच्या एकदिवसीय कर्णधारपदाबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषक संपल्यानंतर १७ नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर उभय संघांत दोन कसोटीसुद्धा खेळवण्यात येतील. कोहलीने ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याने निवड समितीला नव्या कर्णधाराची नेमणूक करावी लागणार आहे. तसेच ‘आयसीसी’च्या जागतिक स्पर्धा जिंकण्यात वारंवार अपयश येत असल्याने कोहलीचे एकदिवसीय कर्णधारपदही धोक्यात येण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी पुन्हा ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार आहे.

हार्दिक, भुवनेश्वरला वगळणार?

पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाला ११ महिनेच शिल्लक असल्याने निवड समितीला आतापासूनच संघबांधणी करावी लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी काही नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता असून अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संघातून वगळण्यात येऊ शकते. ‘आयपीएल’च्या १४व्या हंगामात सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर ऋतुराज गायकवाड, अष्टपैलू वेंकटेश अय्यर, आवेश खान, हर्षल पटेल यांची संघात वर्णी लागण्याची शक्यता आहे.