ज्येष्ठ क्रिकेट सांख्यिकीतज्ज्ञ आनंदजी जमनादास डोसा यांचे सोमवारी न्यूयॉर्क येथे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. आठवडय़ाभरापूर्वी त्यांनी आपल्या वयाची ९८ वष्रे पूर्ण केली होती. डोसा यांच्या पश्चात अमेरिकेत स्थायिक असलेल्या दोन मुली असा परिवार आहे.
१५ सप्टेंबर १९१६ या दिवशी कच्छ (गुजरात) येथे डोसा यांचा जन्म झाला. ते न्यू इरा स्कूलकडून आंतरशालेय आणि विल्सन महाविद्यालयाकडून आंतरमहाविद्यालयीन स्तरावर खेळले होते. १९४१मध्ये बॉम्बे पेंटॅग्युलर क्रिकेट स्पध्रेत हिंदू संघाचे आणि १९४१-४२, १९४७-४८ रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेत बॉम्बे (आता मुंबई) संघाचे ते राखीव खेळाडू होते. सलामीवीर फलंदाज, यष्टीरक्षक आणि मध्यमगती गोलंदाजी ही त्यांच्या खेळाची वैशिष्टय़े होती.
१९५६-५७ ते १९७२-७३ या कालखंडात विजय र्मचट, सुरेश सरैय्या आणि राजू भारतन् यांच्यासोबत डोसा आकाशवाणी समालोचन कक्षात कार्यरत असायचे. १९७३नंतर काही वष्रे ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सांख्यिकी समितीचे अध्यक्ष होते. १९८०मध्ये भारतीय क्रिकेट सांख्यिकी आणि गुणलेखन संघटनेची स्थापना झाली आणि ते पहिले अध्यक्ष झाले. सर्वोत्तम गुणलेखनासाठी या संघटनेकडून डोसा यांच्या नावाने काही वष्रे पुरस्कार दिला जात होता.
कांगा वाचनालयाच्या स्थापनेपासून डोसा व्यवस्थापन मंडळावर होते. याचप्रमाणे  मुंबई क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्यत्वही त्यांनी भूषवले होते. तसेच हिंदू जिमखान्याचे सचिव, जॉली क्रिकेटर्स संघाचे संस्थापक सदस्य होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनची पंच परीक्षासुद्धा ते उत्तीर्ण झाले होते.